14 December 2019

News Flash

संगीतकार म्हणून नाव देण्याआधी सचिन यांनी अवधूतपुढे ठेवली होती ‘ही’ अट

एका कार्यक्रमात सचिन यांनी सांगितला किस्सा

सचिन पिळगांवकर आणि अवधूत गुप्ते

सचिन पिळगांवकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील विद्यापीठ. अभिनय, संगीत, दिग्दर्शन, नृत्य, एडिटिंग इत्यादी विविध क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. ‘कलर्स मराठी’ या वाहिनीवरील सुप्रसिद्ध ‘सूर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमात ते या आठवड्यात पाहुणे परिक्षक म्हणून आले होते. सचिन यांनी यावेळी त्यांच्याबद्दलचा एक किस्सा सांगितला. संगीतदार म्हणून त्यांचा पहिला चित्रपट कोणता आणि संगीतकार म्हणून त्यांचे नाव कसे झळकले याबाबत सचिन यांनी कार्यक्रमादरम्यान सांगितले.

‘आयडियाची कल्पना’ हा सचिन पिळगांवकर यांचा संगीतदार म्हणून पहिलाच मराठी चित्रपट होता. या चित्रपटात संगीतकार म्हणून अवधूत गुप्ते कार्यरत होता. त्या चित्रपटातील एकूण चार गाण्यांपैकी दोन गाणी अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध केली होती. इतर दोन गाण्यांसाठी संगीत कसं असावं याबद्दल अवधूत गुप्ते याला सचिन पिळगांवकर यांनी आपली कल्पना सांगितली. त्यांनी सांगितलेल्या दोनही चाली अवधूत गुप्तेला खूप आवडल्या आणि तेव्हा अवधुतने सचिन पिळगांवकर यांनाच ती दोन गाणी संगीतबद्ध करण्याची विनंती केली.

अवधुतच्या विनंतीला मान देऊन सचिन पिळगांवकर यांनी ती दोन गाणी संगीतबद्ध केली. त्यामुळे सचिन पिळगांवकर यांचं पहिल्यांदा संगीतकार म्हणून नाव एखाद्या चित्रपटाच्या क्रेडिट लिस्टमध्ये झळकले. पण त्यांनी संगीतकार म्हणून नाव देण्याआधी अवधूत गुप्तेपुढे एक अट ठेवली होती.

सचिन यांना स्वतःचे नाव द्यायचे नव्हते. पण जी गाणी मी संगीतबद्ध केली नाहीत; त्याचे श्रेय मी घेणार नाही, असे सांगत अवधुतने सचिन पिळगांवकर यांचे नावही संगीतकार म्हणून दिले. त्यावेळी अखेर सचिन पिळगांवकर यांनी अवधुतपुढे एक अट ठेवली. ‘जर माझं नाव संगीतकार म्हणून देण्यात येणार असेल, तर माझं नाव अवधुतच्या नावाच्या नंतर येईल. कारण मी संगीतकार या क्षेत्रात अवधुतपेक्षा ज्युनिअर आहे’, अशी अट त्यांनी ठेवली होती. ती अट मान्य करत अखेर पहिल्यांदा सचिन यांचे नाव संगीतकार म्हणून देण्यात आले.

सचिन पिळगांवकर यांचा सगळ्यात मोठा चाहता कोण? यावरून कार्यक्रमाचे परिक्षक अवधूत गुप्ते आणि महेश काळे यांच्यात स्पर्धा रंगली होती. त्यावेळी सूत्रसंचालक स्पृहा जोशी हिने त्यांना सचिन पिळगांवकर यांचा संगीतकार म्हणून पहिला मराठी चित्रपट कोणता असा प्रश्न विचारला होता. त्यावर अवधूतने योग्य उत्तर दिल्यानंतर सचिन यांनी याबाबतचा किस्सा सांगितला.

First Published on November 19, 2019 4:35 pm

Web Title: sachin pilgaonkar put one condition to avdhoot gupte before agreeing on giving name as music director for movie ideachi kalpana vjb 91
Just Now!
X