मी देखील घराणेशाहीचा शिकार झालो पण त्याबद्दल कोणी बोलत नाही असं वक्तव्य करत अभिनेता सैफ अली खानने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. ‘न्यू इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत तो बोलत होता. सुशांत सिंह राजपूत व बॉलिवूडमधील घराणेशाही यावर तो व्यक्त झाला. मात्र त्याचं हे विधान नेटकऱ्यांच्या पसंतीस पडलं नाही. घराणेशाहीच्या वक्तव्यावरून सैफ अली खान सोशल मीडियावर जोरदार ट्रोल होत असून नेटकऱ्यांनी त्याची खिल्ली उडवली आहे.

जर न्यायाधीशानेच गुन्हा केला तर त्याला न्याय कोण देणार, अशा आशयाचा मीम एका नेटकऱ्याने पोस्ट केला. तर काहींनी काँग्रेसचे राहुल गांधी यांचंही नाव घेत सैफला ट्रोल केलंय. ‘यांच्या हातात सोन्याची वाटी दिली तरी हे लोक भीक मागतील’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी सैफची खिल्ली उडवली आहे.

काय म्हणाला सैफ अली खान?

घराणेशाहीबद्दल तो म्हणाला, “कॉफी विथ करण या शोमध्ये कंगना काय बोलत होती ते मला माहित नाही. करण जोहरबद्दल म्हणायचं झाल्यास, त्याने स्वत:ला इतकं मोठं बनवलं आहे की आता त्यामुळे त्याला टीकेला सामोरं जावं लागत आहे. सत्य हे नेहमी गुंतागुंतीचं असतं. त्यात इतरही बऱ्याच गोष्टी असतात. पण लोकांना त्यात रस नसतो. मला आशा आहे की ही लाट लवकरच संपेल आणि चांगल्या गोष्टी पुन्हा ऐकायला मिळतील. भारतात असमानता आहे आणि त्याकडे लक्ष वेधणं गरजेचं आहे. घराणेशाही, पक्षपातीपणा, गटबाजी हे सर्व खूप वेगळे विषय आहेत. मीसुद्धा घराणेशाहीचा शिकार झालो पण त्याबद्दल कोणी काही बोलत नाही. चित्रपट संस्थांमधून अधिकाधिक लोक पुढे येत असल्याचं पाहून मला आनंद होतो.”