अभिनेत्री रिंकू राजगुरू हे नाव आता कलाविश्वाला नवीन राहिलेलं नाही. मराठी कलाविश्वाप्रमाणेच हिंदी चित्रपटसृष्टीतही तिच्या नावाची चर्चा होत असते. ‘सैराट’,’कागर’ या चित्रपटांमध्ये दमदार अभिनय केल्यानंतर रिंकू लवकरच ‘मेकअप’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटामध्ये ती पहिल्यांदाच एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. अलिकडेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. यात रिंकूचा अभिनय साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे तिच्या अभिनयाची भुरळ बिग बी अर्थात अमिताभ बच्चन आणि सलमान खान यांनाही पडली आहे. त्यांनी ट्विटरवर हा ट्रेलर शेअर केला आहे.

गेल्या काही काळात बॉलिवूड सेलिब्रिटींचा मराठी चित्रपटसृष्टीकडे येण्याचा ओघ वाढला आहे. जेनेलिया डिसूझा, प्रियांका चोप्रा, माधुरी दीक्षित, अजय देवगण, सलमान खानसारखे कलाकार मराठी चित्रपटांकडे आकर्षित होत आहेत. त्यातच सलमान खान आणि अमिताभ बच्चन यांनादेखील रिंकूच्या ‘मेकअप’ची भुरळ पडली आहे.


गणेश पंडित दिग्दर्शित मेकअप हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती दीपक मुकूट, बी. बालाजी राव, हिरेन गाडा, नीरज कुमार बर्मन, अमित सिंग यांनी केली आहे. प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचे पॅकेज असणाऱ्या या चित्रपटात प्रतीक्षा लोणकर, मिलिंद सफई, राजन ताम्हाणे, सुमुखी पेंडसे, स्वाती बोवलेकर, तेजपाल वाघ आदी चेहरेही झळकणार आहे.