काही वर्षांपूर्वी अभिनेत्री स्नेहा उल्लालने सलमान खानबरोबर ‘लकी’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. चित्रपटातील भूमिकेपेक्षा तिच्या एश्वर्या रायसारख्या दिसण्यानेच ती चर्चेत राहिली हेती. त्यानंतर ती पुन्हा बॉलिवूड चित्रपटात दिसली नाही. मधल्या काळात तिने दक्षिणेकडील चित्रपटांमधून काम करणे सुरू ठेवले. दक्षिणेकडील चित्रपटांच्या अनुभवाच्या जोरावर आणि सलमान खानच्या मार्गदर्शनाखाली ती पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये परतण्यासाठी प्रयत्न करत आहे. या विषयी बोलताना स्नेहा म्हणाली, ‘लकी- नो टाईम फॉर लव्ह’ बॉलिवूडमधील या माझ्या पहिल्या चित्रपटापासून मी आणि सलमान एकमेकांच्या संपर्कात आहोत. जेव्हा मी हा चित्रपट केला, तेव्हा हे क्षेत्र माझ्यासाठी नवखे होते. आता दक्षिणेत काही चित्रपट केल्यावर, बॉलिवूडच्या प्रवेशासाठी मी सिध्द आहे. यासाठी, काही काळापासून सलमान मला मार्गदर्शन करत आहे. या विषयी बोलताना ती पुढे म्हणाली, ‘शो-बीझ’मध्ये आकर्षक दिसणे महत्वाचे असल्याचे सलमान म्हणतो. त्याने मला जीममध्ये ट्रेनिंग घेण्यास आणि बेली डान्स शिकण्यास सांगितले आहे. त्याचप्रमाणे चांगल्या कामासाठी त्याने मला नेहमी प्रेरणा दिली असून, त्याला माझ्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा आहे. तेलगु चित्रपटांमधून काम केलेल्या स्नेहाला बॉलिवूडमध्ये काळजीपूर्वक पुनरागमन करायचे आहे. माझ्याकडे चित्रपटांची विचारणा होत असून, आनंदाबरोबरच मला चिंता देखील वाटते. मी पुरेसा वेळ घेऊन कोणतीही घाई न करता सावकाशपणे मार्गक्रमण करू इच्छीते. या क्षेत्रात तीव्र स्पर्धा असल्याने कोणतीही चूक न करता काळजीपूर्वक चित्रपट स्विकारायचे असल्याचे ती म्हणाली. सलमानच्या एखाद्या आगामी चित्रपटात काम करण्याबाबत विचारले असता सलमानकडून अद्याप तशी विचारणा झाली नसल्याचे ती म्हणाली.