जवळपास २० वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर न्यायालयाने गुरुवारी दोषी ठरवलं. सलमानच्या विरोधात निर्णय देत त्याला पाच वर्षे कारावासाची शिक्षाही सुनावण्यात आली. या प्रकरणात अभिनेत्री सोनाली बेंद्रे, तब्बू, नीलम आणि अभिनेता सैफ अली खान या सर्वांवरही काही आरोप करण्यात आले होते. पण, गुरुवारी न्यायालयाने त्यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली. मात्र, या प्रकरणात दोन अभिनेत्रीसुद्धा दोषी आहेत, असा दावा प्रत्यक्षदर्शीने केला आहे.

‘सीएनएन न्यूज १८’ने दिलेल्या वृत्तानुसार, तब्बू आणि सोनाली बेंद्रे या दोघींनी सलमानला काळवीट शिकारीसाठी प्रवृत्त केलं असं प्रत्यक्षदर्शीचं म्हणणं आहे. ‘मला बंदुकीच्या गोळीचा आवाज आला आणि काळवीटांना पळताना मी पाहिलं. सलमानने बंदुकीचा चाप ओढला. सोनाली बेंद्रे आणि तब्बूने त्याला म्हटलं की, जर तू इतक्या लांब आलाच आहेस तर आता शिकारी कर,’ असं त्या प्रत्यक्षदर्शीने म्हटलं.

वाचा : ‘या’ एक्सपर्ट रिपोर्टमुळे सलमान गेला गजाआड

न्यायालयाच्या म्हणण्यानुसार नीलम, सोनाली, तब्बू आणि सैफ यांच्याविरोधात कोणतेच पुरावे उपलब्ध नाहीत. बचाव पक्षाचे वकील श्रीकांत शिवाडे यांनी न्यायालयासमोर मांडलेल्या काही गोष्टींनुसार हे चार कलाकार आणि पाचवा आरोपी दुष्यंत सिंह यांचा शिकारीमध्ये सहभाग असल्याविषयीचा कोणताही पुरावा प्रत्यक्षदर्शी आणि तक्रारकर्ता पूनमचंद बिष्णोई देऊ शकले नाहीत. त्यामुळे या अभिनेत्रींवर कोणताही आरोप सिद्ध झाले नसल्याचं म्हटलं जात आहे.