सध्या असहिष्णुतेचा वाद भारतात शिगेला पोहचत चालला आहे. राजकारणी, कलाकार, साहित्यकार सर्वांनीच याबाबतीत आपापली मते स्पष्ट करण्यास सुरुवात केली असून, यावरून एकमेकांवर टीकांचाही वर्षाव केला जातोय. बॉलीवूडचा बादशाहा शाहरुख खान याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे राजकारण्यांच्या कचाट्यात सापडला आहे. असे असताना, माध्यमे अभिनेता सलमान खानला तरी कसे सोडतील.
नुकतंच सलमान आणि सोनम त्यांच्या आगामी चित्रपटाच्या गाण्याच्या प्रदर्शनासाठी पोहचले होते. त्यावेळी माध्यमांनी चित्रपटसृष्टीतील नामवंत व्यक्ती परत करत असलेले पुरस्कार आणि भारतात टोकाची असहिष्णुता असल्याचे शाहरुखने केलेले वक्तव्य याबाबत विचारले. त्यावर सलमान म्हणाला, यावर बोलण्यासाठी हे योग्य ठिकाण नाही. आम्ही इथे आमच्या चित्रपटाबाबत चर्चा करण्यासाठी आलो आहोत. पण, तरीही याबाबत प्रश्नांचा भडीमार होत असल्याचे पाहून सलमानने योग्य उत्तर सर्वांना दिले. तो म्हणाला, मी फक्त एवढेच बोलू इच्छितो माझी आई सुशिला चारक आहे तर वडिल सलीम खान. पण तरीही प्रश्न थांबतचं नव्हते, त्यावर मी पुन्हा सांगतोय की माझी आई सुशिला चारक तर वडिल सलीम खान आहेत. मी सलमान खान तर ही सोनम कपूर आहे. आपण सर्वजण इथे एकत्र बसलो आहोत आणि त्यामुळे काही फरक पडलेला दिसतोय का? असे सलमान म्हणाला.
देशात असहिष्णुता वाढत आहे असे तुला वाटते का? असे सलमानला विचारले असता त्याने तोच प्रश्न उलट फिरवला. तुम्ही मला सांगा, तुम्ही स्वतः माध्यमांमधून आहात. देशात असहिष्णुता वाढतेय असं तुम्हाला वाटतयं का? असे सलमानने पत्रकाराला विचारले. त्यावर सदर पत्रकाराने नाही असे उत्तर दिले. त्यावर सलमान म्हणाला, जेव्हा तुम्हाला माहित आहे की हे सर्व मुद्दामून निर्माण केल जातयं आणि तुम्ही त्यावर चर्चा करून अधिक भडका उडवून देत आहात. आपण याबाबत का बोलत आहोत? बाहरे जे केले जातेय तेच तुम्ही इथे करताय. चांगले विषयावर कधीचं बोलले जात नाही, अशा शब्दात उत्तर देऊन सलमानने सर्वांनाच गप्प केले.