१५ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून सर्व वाहनचालकांना टोलनाक्यांतून जाण्यासाठी ‘फास्टॅग’ची (FASTag) सक्ती करण्यात आली आहे. पण, प्रवाशांचा वेळ वाचावा यासाठी फास्टॅगची सेवा सुरू करण्यात आली असली तरी अवघ्या दोन-तीन दिवसांमध्येच या सेवेतील अनेक त्रुटी समोर आल्यात. तांत्रिक अडचणींमुळे या सेवेसाठी पूर्वीप्रमाणेच वेळ वाया जात असल्याचा अनुभव अनेकांना येतोय.

प्रसिद्ध कवी आणि गीतकार संदीप खरे यांनाही कोल्हापूर-पुणे प्रवासात असाच वाईट अनुभवाचा सामना करावा लागला, त्यानंतर सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करुन त्यांनी प्रशासनाने काहीतरी उपाय शोधावा अशी विनंती केली आहे. गुरुवारी सकाळी कोल्हापूर-पुणे महामार्गावरील किणी टोलनाक्यावर घडलेला प्रकार त्यांनी सांगितला.

व्हिडिओत काय म्हणाले संदीप खरे :-
“टोलनाका आला की आता टेन्शन येतं… इतके दिवस गर्दीचं टेन्शन होतं… आता गर्दी + फास्टॅगचं टेन्शन आहे”, अशा आशायच्या कॅप्शनसह संदीप खरेंनी व्हिडिओ शेअर केला आहे. “नमस्कार, मी कोल्हापूरजवळ किणी टोलनाक्यावर होतो…तिथे फास्टॅग स्कॅन झालं नाही… टोल नाक्यावरील माणूस पॅसेंजर सीटसमोरचा फास्टॅग स्कॅन करण्याचा प्रयत्न करत होता, तो स्कॅन झाला नाही..फास्टॅगला बऱ्याचदा हा प्रॉब्लेम येतो….गाडी मागे-पुढे केली की मग ते मशिन आणतात, मग ते स्कॅन करतात…नाही झालं की मग ते पैसे घेतात. पण, आज तर त्यांनी माझ्याकडे ७५ + ७५ म्हणजे दीडशे रुपये असा दुप्पट दंड मागितला. माझ्या कार्डमध्ये पैसे आहेत त्यामुळे मी पैसे देणार नाही अशी भूमिका मी घेतली. त्यानंतर त्यांचा उत्तर भारतीय बॉस आला आणि तुम्हाला उभं राहायचं असेल तर उभं राहा पण पैसे द्यावे लागतील असं सांगितलं. त्याने हुज्जत घातल्यानंतर फास्टॅग पुन्हा स्कॅन केला, यावेळी फास्टॅग स्कॅन झाला. पण या सर्व गडबडीमध्ये माझे 10 मिनीटे वाया गेले. त्यामुळे यावर संबंधीत प्रशासनाने काहीतरी उपाय करावा, कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण द्या…सिस्टिम दुरूस्त करा पण कृपया काहीतरी उपाय करा” अशी विनंती खरे यांनी केली आहे.


खोट्या FASTag ची विक्री :-
दरम्यान, खोट्या FASTag पासून सतर्क राहण्याचं आवाहन NHAI ने नागरिकांना केलं आहे. “काहीजण फसवणूक करुन ऑनलाइन खोटे FASTag विकत आहेत. हे FASTag दिसायला अगदी NHAI/IHMCL च्या फास्टॅगप्रमाणेच आहेत. पण हे खोटे FASTag टोलनाक्यांवर काहीही कामाचे नाहीत, कारण त्या फास्टॅगद्वारे तुम्हाला टोलप्लाझा ओलांडून जाण्याची परवानगी मिळू शकत नाही”, असा इशारा NHAI ने दिला आहे.

फक्त इथून खरेदी करा FASTag :-
लोकांनी खरा FASTag खरेदी करण्यासाठी http://www.ihmcl.co.in या वेबसाइटवर क्लिक करावं किंवा MyFastag App चा वापर करावा, असंही NHAI कडून सांगण्यात आलं आहे. याशिवाय युजर्स एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय अशा २३ नामांकित बँकांच्या शाखांमधून किंवा ऑनलाइन फास्टॅग विकत घेता येतो. तसेच, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत येणाऱ्या सर्व टोलनाक्यांवर, पेटीएम, अ‍ॅमेझॉन आणि माय फास्टॅग अ‍ॅपवरही सुविधा उपलब्ध आहे.

..तर थर्ड पार्टी इन्शुरन्स नाही :-
केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने १५ फेब्रुवारी २०२१ पासून सर्व चार चाकींसह अन्य वाहनांना फास्टॅग अनिवार्य केले आहे. परंतु ज्या वाहनचालकांकडून याची अंमलबजावणी होत नसेल, त्यांना थर्ड पार्टी इन्शुरन्स दिला जाणार नाही. एप्रिल २०२१ पासूनही त्याची अंमलबजावणी करण्याचा विचार मंत्रालयाकडून होत आहे.

नियमावली कोणती?

* फास्टॅग मिळवण्यासाठी कार मालकाचे केवायसी कागदपत्र, ओळखपत्र, वास्तव्याचा पुरावा, वाहन नोंदणी प्रमाणपत्र व मालकाचा फोटो हवा

* एक लाख रुपयांपर्यंत फास्टॅग रिचार्ज करता येणार असून बचत खात्याला लिंक करता येईल.

* डेबिट-क्रेडिट कार्ड, आरटीजीसी, चेकद्वारे टॅग ऑनलाइन रिचार्ज करण्याची सुविधा

* टोल नाक्यावरून जाताना वाहनचालकांना वाहनाचा वेग कमी ठेवावा लागेल.