मराठी चित्रपटांमध्ये नायक साकारणारे कलावंत आणि त्यांचा ‘लूक’ प्रेक्षकांच्या चांगलाच परिचयाचा असतो. ‘लूक’बाबत आतापर्यंत फारसा विचार केला जात नव्हता. अलीकडे मात्र प्रमुख भूमिकेतील अनेक कलावंत वेगवेगळ्या ‘लूक’मध्ये पाहायला मिळू लागले आहेत. ‘डोंबिवली फास्ट’, ‘प्रेमसूत्र’ अशा वेगवेगळ्या चित्रपटांमुळे गाजलेला अभिनेता संदीप कुलकर्णी आगामी ‘राजभाषा’ या चित्रपटात एकदम वेगळ्या ‘लूक’मध्ये लोकांसमोर येणार आहे. कथा-पटकथा-संवाद-दिग्दर्शन अशी चौफेर जबाबदारी सांभाळणारे ज्ञानेश्वर मर्गज यांचा हा पहिलाच मराठी चित्रपट असून प्रमुख अभिनेत्री विशाखा हिने साकारलेली राधा ही व्यक्तिरेखा ३५ भाषांमधील शब्दांचा वापर करून बोलणारी आहे. वऱ्हाडी, कानडी, अहिराणी, मालवणी, मराठवाडी, उर्दू, हिंदी, तामिळ, बंगाली, मल्याळम, तेलुगू, झाडीबोली, नागपुरी, चंदगडी, वाडवळी, देहवाली, पाली, नगरी, कारवारी, बाणकोटी, मांगेली, आगरी, वंजारी, संगमेश्वरी, डांगी, मावळी, कातकरी, आसामी, ठाकरी, मारवाडी, गौंडी, रायपुरी, किरीस्ताव अशा वेगवेगळ्या बोली आणि भारतीय भाषांमध्ये लिहिण्यात आलेले संवाद विशाखाच्या तोंडी आहेत, अशी माहिती ज्ञानेश्वर मर्गज यांनी दिली.
भाषाविषयक वेगळे काही सांगणारा हा चित्रपट असून संदीप कुलकर्णीचा वेगळा लूक आणि विविध भाषांचा संवादातून वापर करण्याबरोबरच या सिनेमामध्ये प्रथम २१ नवोदित कलाकारांना दिग्दर्शकाने काम करण्याची संधी दिली आहे. आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे कौशल इनामदार यांचे गाजलेले ‘लाभले आम्हास भाग्य..’ हे महाराष्ट्र अभिमान गीत या सिनेमात वापरण्यात आले आहे.