26 February 2021

News Flash

नर्मविनोदी रहस्यमय धमाल

लीकडच्या काळात मराठी चित्रपटांमध्ये ऐतिहासिक घटना, तसेच इतिहासावर आधारित चित्रपट आले आहेत. शौर्यकथा, ऐतिहासिक व्यक्तींवरचे चित्रपट अशा स्वरूपाचे असूनही चित्रपटांमध्ये तर्कसुसंगतपणा असतोच असे नाही. विनोद

| June 7, 2015 02:15 am

अलीकडच्या काळात मराठी चित्रपटांमध्ये ऐतिहासिक घटना, तसेच इतिहासावर आधारित चित्रपट आले आहेत. शौर्यकथा, ऐतिहासिक व्यक्तींवरचे चित्रपट अशा स्वरूपाचे असूनही चित्रपटांमध्ये तर्कसुसंगतपणा असतोच असे नाही. विनोद आणि स्वातंत्र्यलढय़ाची पाश्र्वभूमी असलेला ‘संदूक’ हा चित्रपट मात्र निखळ करमणूक करणारा आणि धमाल गमतीजमती दाखवतानाही तर्कसुंसगत बनविण्यात आल्यामुळेच यशस्वी ठरला आहे. संदूक या चित्रपटाच्या शीर्षकातूनच हा चित्रपट रहस्यमय असणार हे प्रेक्षकाला लगेच समजते. मध्यंतरापूर्वी थोडी धीम्या गतीने आणि मध्यांतरानंतर वेगाने संदुकीचे रहस्य उलगडत जाते. सुरुवातीपासून शेवटापर्यंत नर्मविनोदी छोटय़ा छोटय़ा घटना आणि रहस्य टिकवून ठेवल्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचविण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरला आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळातील संबळगड नावाच्या एका आडगावात स्कॉट नावाचा एक इंग्रज अधिकारी येतो. क्रूरकर्मा म्हणून आधीपासूनच त्याची ख्याती असते. आधीच्या इंग्रज अधिकाऱ्याची हत्या करणाऱ्या माधवराव नामक क्रांतिकारकाचा शोध घेऊन त्याला पकडण्याची मोहीम तो हाती घेतो. चित्रपटाचे नायक वामनराव अष्टपुत्रे हे इतिहासात प्रचंड रमणारे पोस्टातील कर्मचारी आहेत. अष्टपुत्रेंचे चार-पाच पूर्वज शूरवीर होते. त्यांनी इतिहास घडविला. शिवाजी महाराजांनी अष्टपुत्रेंच्या एका पूर्वजाला पराक्रम गाजविल्यावर तलवार भेट म्हणून दिली होती. ती तलवार आणि अष्टपुत्रेंचे समस्त शूरवीर पूर्वज यांच्या तसबीरी वामनराव अष्टपुत्रेंच्या घरात सदैव दिसतात. दररोज पूर्वजांना नमस्कार करून आपण घडविलात तसाच इतिहास इंग्रजांना धडा शिकवून मलाही घडवायचा आहे ही वामनराव अष्टपुत्रेंची एकच इच्छा आहे. परंतु पोस्टात काम करणारे भित्रट कर्मचारी असलेले वामनराव अष्टपुत्रे यांची कितीही इच्छा असली तरी मुलखाचे धांदरट असल्यामुळे यांच्या हातून काही कामगिरी घडेल याची सुतराम शक्यता नाही. हे केवळ अष्टपुत्रेंच्या पत्नीलाच नव्हे तर अख्ख्या गावाला ठाऊक असते. इतिहासात रमण्याच्या वामनराव अष्टपुत्रेंच्या स्वभावामुळे गावातील सगळेजण मिळेल तेव्हा त्यांची टर उडविण्याच्या प्रयत्नात नेहमी असतात. पण अशाच काही घटना घडतात आणि संदुकीचे रहस्य जपून ठेवण्याची जबाबदारी अचानक वामनराव अष्टपुत्रे यांच्यावरच सोपवली जाते. त्यातून ज्या गमतीजमती घडतात त्याभोवती चित्रपटाची गुंफण केली आहे.

पापभीरू सर्वसामान्य माणून जेव्हा आपल्या घराण्याचा वैभवशाली इतिहास आणि पूर्वजांनी केलेले पराक्रम याच्या केवळ रम्य गोष्टी सांगण्याच्या फुशारक्या मारतो तेव्हा विनोदाची निर्मिती स्वाभाविकपणे होतेच. याचाच आधार संपूर्ण चित्रपटात दिग्दर्शकाने घेतला आहे. सुमीत राघवनने देहबोली, लकबी, अभिनय यातून वामनराव अष्टपुत्रे ही व्यक्तिरेखा जबरदस्त धमाल पद्धतीने उभी केली आहे. छोटय़ा पडद्यावर बरीच वर्षे काम केल्यानंतर प्रथमच मराठीच्या रूपेरी पडद्यावर पदार्पण करूनही सुमीत राघवनने अष्टपुत्रे ही व्यक्तिरेखा अफलातून साकारली आहे. सुमीत राघवनसह सर्व प्रमुख भूमिकांमधील कलावंतांचा अभिनय हे या चित्रपटाचे बलस्थान ठरले आहे. रहस्याचा अंदाज लावू न देता रचलेली पटकथा हा या चित्रपटाचा सामथ्र्यबिंदू असून त्यामुळेच प्रेक्षकांची उत्कंठा वाढत जाते आणि मगच रहस्याची उकल होते. शीर्षकाला धरून कुठेही न भरकटता कथानक पुढे पुढे नेण्याची पद्धत, श्रवणीय संगीत आणि गाणी यामुळेही प्रेक्षकांची निखळ करमणूक करण्यात चित्रपट एकदम यशस्वी झाला आहे. नर्मविनोदाची झालर ठेवून रहस्यमय चित्रपट साकारण्याच्या दिग्दर्शकाच्या हातोटीला दाद द्यायला हवी. शरद पोंक्षे यांना बऱ्याच कालावधीनंतर चित्रपटात चांगली भूमिका मिळाली असून त्याला त्यांनी न्याय दिला आहे.

संदूक

निर्माते – विश्वजीत गायकवाड, मंदार केणी

दिग्दर्शक – अतुल काळे

कथा – अतुल काळे

पटकथा – आशीष रायकर, अतुल काळे, सुबोध के

छायालेखक – अजित रेड्डी

संकलक – सर्वेश परब

कला दिग्दर्शक – महेश कुडाळकर

संगीत – अजित-समीर

कलावंत – सुमीत राघवन, भार्गवी चिरमुले, शरद पोंक्षे, अरुण नलावडे, राहुल मेहेंदळे, शंतनू गंगाणे, रमेश वाणी, राहुल गोरे, ब्रॅण्डन जे हिल, मंगेश सातपुते, सिद्धेश प्रभाकर, दिवेश मेडगे, नंदकुमार पाटील, अजित परब, फिरादौस मेवावाला

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2015 2:15 am

Web Title: sandook movie review
टॅग : Marathi Movie
Next Stories
1 ‘अ फेअर डील’ प्रेमाची द्राविडी चिकित्सा
2 टीका करणे ही ‘फॅशन’च झालीय..
3 शाहरुख आणि भन्साळींच्या चित्रपटात स्वप्निल हीरो!
Just Now!
X