सध्या बॉलिवूडचा संजूबाबा उर्फ अभिनेता संजय दत्त आगमी चित्रपट ‘प्रस्थानम’मध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात संजय दत्त बाहुबली नेते बलदेव प्रताप सिंह यांची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी संजय दत्त ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पोहोचला. दरम्यान त्याने एका चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान डाकूंनी त्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला असल्याचा किस्सा सांगितला.

‘द कपिल शर्मा’ शोमध्ये कपिल शर्माने संजय दत्तला ‘मुझे जीने दो’ चित्रपटाच्या सेटवर तुझे अपहरण करण्यासाठी काही डाकू आले होते अशा तेव्हा अफवा होत्या. हे खरं आहे का? असा प्रश्न विचारला. ‘हो. हे खरे आहे. त्यावेळी रुपा नावाचा डाकू कुख्यात होता. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान मी सेटवर खेळत होतो. मी तेव्हा लहान होतो. रुपा डाकू माझ्या जवळ आला आणि त्याने मला कडेवर उचलून घेतले. नंतर त्याने माझ्या वडिलांना विचारले की आता पर्यंत चित्रपटासाठी किती पैसे खर्च केले आहेत? वडिलांनी १५ लाख खर्च केल्याचे सांगितले. त्यानंतर रुपा डाकूने मी याचे (संजय दत्तचे) अपहरण केले तर किती पैसे देशील? असा प्रश्न विचारला होता. या घटनेनंतर वडिलांनी मला आणि आईला मुंबईला परत पाठवले’ कपिलच्या प्रश्नावर संजय दत्त उत्तर देत म्हणाला.

‘प्रस्थानम’ हा तेलुगू चित्रपटाचा हिंदी रिमेक असून यामध्ये संजय दत्त आणि मनिषा कोईराला यांच्या मुख्य भूमिका आहेत. त्याचप्रमाणे अली फजल आणि अमायरा दस्तुरदेखील या चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटात संजय दत्त बाहुबली नेते बलदेव प्रताप सिंह यांची भूमिका साकारणार आहे.

थ्रिलर फॅमिली ड्रामा या प्रकारात मोडणाऱ्या ‘प्रस्थानम’ या चित्रपटाच्या निमित्ताने संजूबाबा आणि मनिषाची जोडी तब्बल दहा वर्षांनी एकत्र पाहता येणार आहे. याआधी १९९२ मध्ये ‘यल्गार’ चित्रपटातून त्यांनी एकत्र काम केले होते. ज्यानंतर दोघांच्याही बॉलिवूड कारकिर्दीला कलाटणी मिळाली होती. ‘प्रस्थानम’ हा चित्रपट २० सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.