‘नागरिकत्व दुरुस्ती कायदा २०१९’ लागू झाल्यापासून देशभरात निदर्शने सुरू झाली आहे. ईशान्य भारतानंतर राजधानी दिल्लीसह अनेक ठिकाणी आंदोलक रस्त्यांवर उतरले आहेत. दरम्यान ‘जामिया मिलिया इस्लामिया’ विद्यापीठातील काही विद्यार्थांनी ‘नागरिकत्व दुरुस्ती कायदा’ मुस्लिम विरोधी आहे, असे म्हणत आंदोलन केले होते. आंदोलन करणाऱ्या या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या प्रकारावर प्रसिद्ध चित्रपट निर्माता संजय गुप्ता यांनी संताप व्यक्त करत ट्विट केले आहे. देशात सध्या सुरु असलेल्या हिंसाचारामुळे लहान मुलांच्या मनावर त्याचा विपरित परिणाम होत असल्याचे त्यांनी म्हटले.

काय म्हणाले संजय गुप्ता?

“मला सहा आणि आठ वर्षांची दोन मुलं आहेत. त्यांना धर्म म्हणजे काय माहित नाही. त्यांनी आपल्या आईला आपण हिंदू आहोत का? असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर नाही आपण भारतीय आहोत असे उत्तर तिने दिले. परंतु माझी समस्या ही आहे की माझ्या मुलांना असा प्रश्न पडूच कसा शकतो?” अशा आशयाचे ट्विट संजय गुप्ता यांनी केले आहे. त्यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासात हजारो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

यापूर्वी अनुभव सिन्हा, विकी कौशल, पूजा भट्ट, आलिया भट्ट, परिणीती चोप्रा, रेणूका शहाणे, जावेद जाफरी, हूमा खुरेशी, स्वरा भास्कर यांसारख्या अनेक बॉलिवूड कलाकारांनी ट्विट करुन जामिया हिंसाचार प्रकरणावर संताप व्यक्त केला होता.