सेलिब्रिटी लेखक
संकर्षण कऱ्हाडे – response.lokprabha@expressindia.com

या क्षेत्रात काम करताना मला माझं जगणं समृद्ध करणारी काही सीनिअर मंडळी भेटली. हे माझे दोस्त माणूस म्हणूनही फार उंचीवर आहेत.

करिअरमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी चांगले, समजूतदार आणि तुमचाही आदर करणारे सीनिअर्स तुम्हाला मिळणं हे चांगली बायको मिळण्याइतकंच नशिबावर अवलंबून असतं. कारण, एकतर त्यांच्याबरोबर तुम्हाला आयुष्यातला आणि कामाचा खूप वेळ घालवायचा असतो आणि त्यांच्याशी तुमचं जुळत नसेल तर तुम्हाला फार वाच्यताही करता येत नाही. शेवटी पदरी पडलं ते गोड मानून, झाकली मूठ ठेवायला लागते.

मी या बाबतीत आजवर तरी फार नशीबवान ठरलोय. कामातल्या बाबतीत माझे पहिले सीनिअर माझे बाबा. स्टेजवर इन्स्पेक्टरच्या वेशात बाबा नाटकात काम करत होते आणि तीन-चार वर्षांचा मी ते माझ्या आईच्या मांडीवर बसून पहात होतो, ते मला आठवतंय. दुसऱ्या दिवसापासून कळतच नव्हतं यांना बाबा म्हणून आदर द्यावा की पोलिस म्हणून घाबरावं. ही घालमेल अर्थातच त्यांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी समजावून सांगितलंच आणि शाळेच्या गॅदिरगमध्ये मला थेट शिवाजी महाराजच केलं आणि करडय़ा आवाजात; ‘मां साहेब.. आपली इच्छा हीच आपली आज्ञा..’  हे बोलायला शिकवलं. तेव्हा कळलं की बाबा इन्स्पेक्टर कसे झाले होते. मीही स्टेजवर कुणीतरी वेगळाच माणूस होऊ  शकतो हेही कळलं.

पुढे मी काम केलेल्या पहिल्या एकांकिकेचं ज्यांनी दिग्दर्शन केलं ते महेश देशपांडे ‘दामिनी’ या दूरदर्शनवरच्या मालिकेचं दिग्दर्शन करायला मुंबईत आले. त्यांच्या ओळखीने मी अगदीच छोटय़ा छोटय़ा भूमिका करण्यासाठी १२ तासांचा प्रवास करून रातोरात मुंबई गाठायचो. मी रात्रीतून अचानक येतो काय, दिवसभर शॉट लागायची वाट पाहतो काय हेच मला ‘स्ट्रगल’ वाटायला लागलं आणि मग मीही काही मोजक्या दिवसांत मोठी भूमिका कशी मिळेल ही चिंता करायला लागलो. तेव्हा महेश देशपांडे यांनी मला सांगितलं की; ‘छोटय़ा छोटय़ा भूमिका या एकेका रनसारख्या असतात. त्यांच्याच आधारावर सेंच्युरी होऊ  शकते.’ खूप चांगलं लक्षात राहिलं हे वाक्य.

मधल्या काळात ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आणि मी विचार करत होतो की स्वत:ला अधिकाधिक नाटकांमध्ये कसं गुंतवावं. तेव्हा मला माझ्या नशिबाने अमेय दक्षिणदास नावाचे लेखक/दिग्दर्शक भेटले. माझ्या अंगी परमेश्वराने, निसर्गाने घातलेले जे काही कलागुण आहेत त्या सगळ्यांना वैचारिक दिशा या माणसाने दिली. वाचनाची गोडी फक्त लावलीच नाही तर; पुस्तकातली पात्रं अनुभवायला शिकवली. ‘फक्त काम मिळवण्याचा नाही तर काम टिकवण्याचा स्ट्रगल आयुष्यभर करत राहा’, हा आदेश दिला.

माझ्या पहिल्याच व्यावसायिक नाटकाचे दिग्दर्शक आणि सहकलाकार होते विनय आपटे. स्टेजवर बोलताना नटाने शेवटचा शब्द खाल्ला आणि प्रेक्षकांना स्टेजवरचं वाक्यं ऐकू गेलं नाही तरी; विनय सरांनी विंगेतनं ‘ड्रॉप करू नको’ ही केलेली गर्जना नक्की ऐकू जायची. त्यांच्याविषयी अनेकांच्या मनात आदरयुक्त भीती होतीच, पण आमची दोस्ती जरा भावनिक होती. ते मला एकदा त्यांच्या ऑफिसला घेऊन गेले. ‘शिवाजी’ मालिकेच्या शूट केलेल्या सगळ्या रील्स मला दाखवल्या आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाले ‘मी मेल्यावर माझ्या चितेवर जाळायचंय हे सगळं.’

तशीच दोस्ती झाली मोहन जोशींबरोबर ‘मी रेवती देशपांडे’ नाटकाच्या निमित्ताने. दोन महिने तालीम आणि काही प्रयोग झाल्यानंतर या नाटकाचे दिग्दर्शक आणि निर्माते यांना मी मोहन जोशींचा मुलगा म्हणून अचानक फार लहान वाटायला लागलो. मग शोधाशोध करून कारणं देण्यात येत होती. हे लक्षात घेऊन जोशींनी जवळ घेतलं आणि चांगल्या नटाला मरण नाही, एक दार बंद झालं तर ९९ दारं उघडतील आणि आयुष्यात फक्त पुढे जात राहायचं हे तीन मंत्र दिले. भारी वाटलं.

असाच समृद्ध करणारा अनुभव विक्रम गोखलेंसोबत सिनेमा करताना आला. सिनेमातला शेवटचा आणि खूप महत्त्वाच्या सीनचं लिखाण आवडलं नसल्याचं त्यांनी दिग्दर्शकाला सांगितलं. खूप धाडसाने मी म्हणालो की मी लिहू का? परवानगी घेऊन मी लिहिला आणि गोखले सरांना तो इतका आवडला की त्यांनी व्हॅनिटी व्हॅनमध्ये निर्माते आणि दिग्दर्शक यांना बोलवून ‘या मुलाचं विशेष साहाय्यक लेखक म्हणून नाव घालणार असाल आणि या लिखाणाचं त्याला मानधन देणार असाल तर हा मी सीन करीन असं सांगितलं. आणि ‘तुझ्यातल्या लेखकाला लाइटली घेऊ  नकोस’ हा बोध मला दिला.

दोस्तीचा खूप कमाल अनुभव मला मकरंद अनासपुरेंनीही दिला. आम्ही एकत्र एक सिनेमा आणि एका नाटकाचा परदेश दौरा केला. मला खूप मनापासून वाटतं की; त्यांच्यातला विनोद हा उथळ नसून तो अत्यंत अभ्यासू खोलीतून आणि अनुभवातून आलाय. माझी वाचनाची आवड लक्षात घेऊन आणि एका नाटकात त्यांना केलेली बरी साथ पाहून त्यांनी मला दोन मोठ्ठे बॉक्स भरून पुस्तकं भेट दिली. आणि आयुष्यभर माझ्या घरातली लायब्ररी वापरू शकतोस असंही सांगितलं.

मागच्या दोन वर्षांत एक नवा दोस्त मिळालाय, ज्याच्या नावावर जगभरात १४ हजार प्रयोग केल्याचा विक्रम आहे. तो दोस्त म्हणजे प्रशांत दामले. हा दोस्त उगाच तोंडावर कौतुक करत बसत नाही पण; ‘हे चुकूनही करू नकोस’ हे सांगायला कधीच चुकत नाही. माझा तुझ्यावर जीव आहे म्हणत बसत नाही पण, दौऱ्यावर वरणभात कालवून खाऊ  घालायलाही कमी करत नाही. अचूक प्लानिंग, व्यवहारीपणा असे अनेक गुण घेण्यासारखे आहेत या दोस्ताकडून. तो कधी शूटच्या डेट्स क्लॅश झाल्या तर ‘तुझं तू बघ’ म्हणून तोंडावर पाडतो आणि कधी अचानक हात हातात घेऊन ‘आता लवकर आजोबा कर’ म्हणतो.

२००९ साली व्यावसायिक नट म्हणून काम करायला सुरुवात केली तेव्हापासून आजवर अनपेक्षितपणे ही अशी काही सीनिअर मंडळी भेटली ज्यांनी मला कलाकार म्हणून समृद्ध केलंच पण; माणूस म्हणूनही त्यांचं स्थान माझ्या आयुष्यात फार उंचीवर नेऊन ठेवलं आणि दोस्त समजून वागवलं. यात संजय मोने, महेश मांजरेकर, भारत गणेशपुरे, चंद्रकांत कुलकर्णी अशी मोलाची मंडळी आहेत.

यांचा अनुभव लुटून माझी शिदोरी भरण्याचा प्रयत्न करतोय. बघू.. माझ्या कामातनं आणि वागण्यातनं मला ‘बरा सीनिअर’ होता येतं का ते!

तत्सत् कृष्णार्पणमस्तु!!
सौजन्य – लोकप्रभा