‘केदारनाथ’, ‘सिम्बा’ यासारख्या चित्रपटांमध्ये दमदार अभिनय करुन प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या सारा अली खानने एका सामान्य कुटुंबातील आई-वडिलांचंही मन जिंकलं आहे. सारामुळे एका आई-वडिलांना त्यांचा हरवलेला मुलगा बऱ्याच वर्षांनंतर सापडला आहे.  काही दिवसापूर्वी सारा अली खानला मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आलं होतं. त्यावेळी साराला पाहिल्यानंतर तिचे चाहते आणि काही छायाचित्रकार तिची एक झलक कॅमेरात कैद करण्यासाठी पुढे सरसावले. यामध्ये एका चाहत्यानेही तिच्यासोबत फोटो काढण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नामध्ये चुकून त्याचा धक्का साराला लागला. या प्रकारानंतर या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. अनेकांनी या चाहत्यांला खरं-खोटंही सुनावलं. मात्र हा व्हिडीओ पाहून एका मात्या-पित्याला त्यांचा हरवलेला मुलगा सापडला.

साराच्या व्हिडीओमुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या या मुलाचं नाव अजय असून तो १७ वर्षांचा आहे. अजय काही दिवसांपूर्वी कोणालाही न सांगता घर सोडून पळून गेला होता. घरातल्यांनी अजयचा शोध घेतल्यानंतरही त्याचा कोठेच पत्ता लागत नव्हता. मात्र साराच्या एका व्हिडीओमुळे अजयच्या घरातल्यांना त्यांचा हरवलेला मुलगा सापडला आहे.

साराचा व्हायरल झालेला हा व्हिडीओ अजयच्या आई-वडिलांनी पाहिला आणि त्यांचा मुलगा सुखरूप असल्याची खात्री त्यांना झाली. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा पोलीस स्टेशन गाठलं आणि अजयला घरी आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.

वाचा :  ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांची विटंबना करणं निंदनीय’ – सुबोध भावे

दरम्यान, “हा व्हिडीओ पाहून अजय सुखरुप असल्याची आम्हाला खात्री झाली आहे. त्याला व्हिडीओमध्ये पाहिल्यानंतर आम्ही ही माहिती पोलीस आणि घरातल्यांना सांगितली. अजय १० वीला आहे. काही दिवसापूर्वी तो शाळेत गेला आणि घरी परत आलाच नाही. तो एटीएम घेऊन मुंबईमध्ये पळून गेला, असं अजयच्या वडिलांनी सांगितलं”.