बॉक्सिंग या खेळामध्ये भारताला आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या डिंको सिंग या बॉक्सरची भूमिका शाहिद साकारणार आहे . या बायोपिकच्या चित्रिकरणास लवकरच सुरूवात होणार आहे मात्र त्याआधीच डिंको सिंगवर आधारित बायोपिकसाठी शाहिदची निवड केल्यामुळे अनेकांकडून टीका करण्यात येत आहे.

‘एअरलिफ्ट’, ‘शेफ’ या चित्रपटांचं दिग्दर्शन करणारे राजाकृष्ण मेनन हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे मात्र भूमिकेसाठी ईशान्येकडील कलाकाराची निवड करण्यापेक्षा शाहिदचीच निवड का करण्यात आली यावरून आता अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे. डिंको हा ईशान्येकडील आहे मग ईशान्येकडील एखाद्या कलाकाराला संधी द्यायला हवी होती अशी टीका करण्यात येत आहे.

मात्र या टीकांमुळे शाहिद काहीसा नाराज झाला आहे. ‘उडता पंजाब’मध्ये पंजाबी तरुणाची भूमिका मी साकारली होती. ‘हैदर’मध्ये काश्मिरी मुलाची भूमिका साकारली पण त्यावेळी कोणीही आक्षेप घेतला नाही मग आताच आक्षेप का ? आपण एका देशात राहतो, मग अमुक एका भागातील कलाकारानंच ती भूमिका साकारावी असा अट्टहास का? असा प्रश्नही त्यानं विचारला आहे.

मणिपूरच्या असणाऱ्या डिंको सिंगने पहिल्यांदाच आशियाई क्रीडा स्पर्धांमधील बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं. २०१३ मध्ये त्याला केंद्र शासनातर्फे देण्यात येणाऱ्या पद्मश्री या पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. डिंको काही नवोदित बॉक्सर्सना प्रशिक्षणही देतो. २०१७ मध्ये डिंकोला कॅन्सरचं निदान झालं आणि तेव्हापासून तो मोठ्या धैर्याने या आजाराला लढा देत आहे. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी सुवर्णपदक जिंकणाऱ्या या खेळाडूची संघर्षगाथा छोट्या पडद्यावर साकारण्यास शाहिदही उत्सुक आहे मात्र तो ईशान्येकडील एखाद्या कलाकारानं साकारावा असं अनेकांनी म्हटल्यानं शाहिद मात्र काहीसा नाराज झाला आहे.