दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारणात उतरण्याचे संकेत दिले असतानाच त्यांच्या राजकीय प्रवेशाला विरोधही सुरु झाल्याचे काही दिवसांपासून पाहायला मिळते आहे. अभिनेता आणि राजकीय नेता शत्रुघ्न सिन्हा Shatrughan Sinha यांनी मात्र रजनीकांतने Rajinikanth राजकारणात यावे, यासाठी उघडपणे पाठिंबा दिला आहे. आज सकाळी केलेल्या ट्विट्समध्ये रजनीकांत यांनी योग्य तो निर्णय घ्यावा, असे शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटलेय.

वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा केल्यानंतरच रजनीकांत राजकरणातील इनिंगची घोषणा करणार ?

लागोपाठ केलेल्या ट्विटच्या मालिकेत त्यांनी लिहिलंय की, ‘कुटुंबातील व्यक्ती, निकटवर्तीय आणि तज्ज्ञांचे मत घेऊन तुम्ही लवकरच योग्य निर्णय घ्याल अशी आशा आहे. मी नेहमीच त्यांच्या पाठीशी मित्र, समर्थक, शुभचिंतक आणि मार्गदर्शक म्हणून उभा आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता. मी नेहमीच तुमच्यासाठी उपलब्ध असेन. तुम्ही कोणासोबत जाण्यापेक्षा लोक तुमच्यासोबत येण्यासाठी तयार आहेत.’ या ट्विटमध्ये ‘विश्वनाथ’ अभिनेत्याने रजनीकांत यांचा उल्लेख ‘टायटॅनिक हिरो ऑफ तमिळनाडू, सन ऑफ इंडिया’ असा केला आहे.

वाचा : राजकारणात येणार असाल, तर भाजपचा नक्की विचार करा; रजनीकांतसाठी भाजपच्या पायघड्या

‘कबाली’ अभिनेता रजनीकांत यांनी राजकारणात येण्याचे संकेत दिले होते. तामिळनाडूतील कोदमबक्कम परिसरात आपल्या चाहत्यांशी संवाद साधताना त्यांनी राजकीय प्रवेशावर सूचक विधान केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. यानंतर त्यांचे चाहते आणि अनुयायी त्यांच्या राजकारणातील प्रवेशावर डोळे लावून बसले आहेत. तब्बल आठ वर्षानंतर चाहत्यांची भेट घेणाऱ्या या अभिनेत्याने, मी जर राजकारणात प्रवेश केला तर नेहमीच सत्याच्या बाजूने उभा राहिन आणि केवळ पैसे कमावू पाहणाऱ्या लोकांची मी दखलही घेणार नसल्याचे म्हटले होते.