बहुतांश तमिळ आणि तेलुगू चित्रपटातून भूमिका केलेली अभिनेत्री, अभिनेता कमल हासन यांची मुलगी आणि गायिका अशी श्रुती हासन हिची ओळख आहे. एक-दोन हिंदी चित्रपटांतून भूमिका केलेली श्रुती आता ‘गब्बर इज बॅक’ हिंदी चित्रपटात अभिनय करण्यासह गायिका म्हणूनही प्रेक्षकांसमोर येणार आहे.
‘जोगिया’ आणि ‘सन्नाटा’ या दोन गाण्यांमुळे लोकप्रिय झालेली श्रुतीचे ‘गब्बर इज बॅक’ या आगामी चित्रपटातही एक गाणे आहे. चित्रपटासाठी तिने पाश्र्वगायन केले आहेच आणि चित्रपटात हे गाणे तिच्यावरच चित्रित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे श्रुतीने हे गाणे अवघ्या एका तासात कोणताही ‘ब्रेक’ न घेता ध्वनिमुद्रित केले.
एका तामिळ चित्रपटासाठी श्रुती मुंबईबाहेर चित्रीकरण करत होती. गाण्याचे ध्वनिमुद्रण करायचे आहे, असा निरोप मिळाल्यानंतर श्रुती तातडीने मुंबईला आली आणि थेट रेकॉर्डिग स्टुडिओत पोहोचली. दरम्यानच्या काळात तिने आपल्याला जे गाणे गायचे आहे त्यावर ‘रियाज’ व अभ्यास करून ठेवला होता. त्यामुळे श्रुतीने गाणे ध्वनिमुद्रित केले आणि त्यानंतर ती आली तशी पुन्हा मुंबईबाहेर चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी रवानाही झाली.
‘गब्बर इज बॅक’ हा ‘रामन्ना’ या तमिळ चित्रपटाचा रिमेक असून यात अक्षयकुमार प्रमुख भूमिकेत आहे. प्रकाश राज व सोनू सूद यांच्याही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.