सुप्रसिद्ध गायक अशी ओळख असणारे मिलिंद इंगळे आपल्या मंत्रमुग्ध गाण्यांनी श्रोत्यांच्या कानाला गारवा देत असतात. १९९८ मध्ये मिलिंद इंगळेंच्या गारवा गाण्याने अवघ्या मराठी श्रोत्यांना बेधुंद केले होते. त्याचवेळी त्याचं ‘छुई मुई सी तुम लगती हो’ हे गाणं तर त्या वर्षीचं ब्लॉकबस्टर ठरलं होतं. तुझ्या टपोऱ्या डोळ्यात माझं इवलंसं गाव, गारवा, सांज गारवा, ये है प्रेम हे त्यांचे अल्बम संगीत क्षेत्रातील नावाजलेले अल्बम आहेत. आता मिलिंद इंगळे वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आपल्या श्रोत्यांना गाण्यांनी तृप्त केल्यानंतर आता ते लाखो खवय्यांच्या जिभेला तृप्त करणार आहेत. गवय्या ते खवय्या या अनोख्या शोच्या माध्यमातून आपली पाककला ते सादर करणार आहेत.

१ जुलैपासून युट्यूबवर सुरु होणार चवदार मेजवानी

मिलिंद इंगळे १ जुलै पासून वेगवेगळ्या रेसिपीज त्यांच्या ‘मिलिंद इंगळे’ या नावाच्या युट्युब चॅनेलवर सादर करणार आहेत. ह्या रेसिपीज तुम्हाला युट्युबसह फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरही बघता येणार आहेत. आपल्या गाण्यांनी लाखो लोकांच्या मनात प्रेमाचे स्थान पटकावलेल्या ह्या गायकाला आता आपल्या पाककृतींना देखील तसंच प्रेम मिळेल अशी आशा वाटते.

‘गवय्या ते खवय्या’ हा फक्त कुकिंगचा शो नसून यामध्ये मिलिंद इंगळे कुकिंग दाखविण्यासोबतच वेगवेगळी गाणी देखील सादर करणार आहेत. सोबतच त्या गाण्यांमागचे किस्से सुद्धा ऐकवणार आहेत. तर कधी काही भागामध्ये एखाद्या सेलिब्रिटीला बोलवून त्यांचा आवडता पदार्थ तयार करुन दाखवणार आहेत. एवढंच नाही तर त्यांच्या रसिक प्रेक्षकांना, चाहत्यांना देखील त्यांच्या स्पेशल रेसिपीज करुन दाखविण्यासाठी निमंत्रित करणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान वेगवेगळ्या स्पर्धांचंही आयोजन करण्यात येणार आहे. यामुळे प्रेक्षक या कार्यक्रमाशी अजून जवळून जोडले जातील.

कार्यक्रमासाठी खास टायटल सॉंग

मिलिंद इंगळेंंनी त्यांच्या नवीन कार्यक्रमाचं टायटल सॉंग नुकतंच युट्यूबवर प्रदर्शित केलं आहे. या गाण्याला आत्तापर्यंत नऊ हजारांहून जास्त प्रेक्षकांनी बघितलं आहे. हे टायटल सॉंग स्वतः मिलिंद इंगळे यांनी लिहलं, गायलं आणि संगीतबद्धही केलं आहे.