करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. याचा आर्थिक परिणाम विविध क्षेत्रात रोजंदारीवर असलेल्या कामगारांच्या जीवनावर झाला आहे. त्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रोजंदारीवर कार्यरत असणाऱ्या कामगारांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध बॉलिवूड गायक शान याने २५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

आकांशा नामक एका स्वयंसेवी संस्थेकडे शानने हे पैसे सुपुर्त केले आहेत. ही संस्था लॉकडाउनच्या काळात गरीब लोकांना गरजेच्या वस्तू पुरवत आहे. या २५ लाख रुपयांचा वापर दररोज लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंच्या वाटपासाठी केला जाईल, असे शानने एक ट्विटमार्फत म्हटले आहे. तसेच त्याने इतरांनाही आपल्या कुवतीप्रमाणे मदत करण्याचे आवाहन केले आहे.

शानचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहेत. अनेकांनी त्याचे या मदतीसाठी तोंड भरुन कौतुक केले आहे.
शान व्यतिरिक्त गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी २५ लाखांची मदत जाहीर केली. त्याचबरोबर अक्षय कुमार, विकी कौशल, अनुष्का शर्मा, आलिया भट्ट, राजकुमार राव, सारा अली खान, शाहरुख खान, सलमान खान, साजित नाडियाडवाला अशा अनेक कलाकारांनी मदत निधी देऊ केला आहे.