जितेंद्रकन्या एकता कपूरने ज्या ‘क’ मालिकेची निर्मिती करून छोटा पडदा गाजवला. नव्हे २००० ते २००८ असे सातत्याने आठ वर्ष, आठवडय़ातले सातही दिवस मालिका चालत इतिहास घडवला तीच मालिका पुन्हा जिवंत करण्याचा संकल्प एकताने सोडला आहे, असे बोलले जात आहे. त्याहूनही मजेशीर गोष्ट म्हणजे त्या मालिकेत सून म्हणून प्रवेश करून ‘बा’ बनून त्या मालिकेची समाप्ती केली ती स्मृती इराणी या मालिकेची सुरुवात ‘बा’च्या रूपात करणार आहे.
२००० साली एकताच्या ‘बालाजी टेलिफिल्म्स’ची निर्मिती असलेली ‘क्यूँ की सास भी कभी बहू थी’ ही मालिका छोटय़ा पडद्यावर दाखल झाली. तेव्हापासून ती जी सुरू झाली ती थांबायचे नावच घेईना. शंभर, दोनशे, चारशे करत हजार भाग झाले तरी ही मालिका एकता कपूरला थांबवावीशी वाटत नव्हती. स्मृती इराणी या मालिकेत सून म्हणून आली होती. त्यानंतर आई, सासू असं करत करत मालिकेने उडय़ांवर उडय़ा घेतल्या आणि ‘एकताकृपे’ने स्मृती ‘बा’च्या भूमिकेपर्यंत येऊन पोहोचली. तोपर्यंत आजूबाजूच्या टेलिविश्वातही क्रांती झाली. रिअ‍ॅलिटी शोचे स्तोम मोजले तेव्हा कुठे एकताला तिच्या सगळ्याच ‘क’ मालिकांचा गाशा गुंडाळावा लागला. तेव्हा कुठे ‘क्यूं की सास भी कभी बहू थी’ ही मालिका सरतेशेवटी संपली. आता पुन्हा विराणी कुटुंबाची कथा सांगणारी ही मालिका पुन्हा सुरू करायची (दु)र्बुध्दी एकताला का सुचते आहे, त्याचे कारण अजून कळलेले नाही.
सध्या स्मृतीही निवडणुकांच्या रणधुमाळीत व्यस्त असल्यामुळे या मालिकेच्या पुनरागमनाविषयी जाहीर वाच्यता करण्यात आलेली नाही.
पण, स्मृतीलाच ‘बा’ची भूमिका करायची आहे, हा एकताचा विचार पक्का झाला असून बाकीच्या कलाकारांचा शोध सुरू आहे, असे बोलले जाते आहे. खरोखरच, जर एकताला ही मालिका स्मृतीला ‘बा’ च्या रूपात सादर करून शुभारंभ करायचाच असेल तर तिने निदान मालिकेचे नाव ‘क्यूं की बा भी कभी बहू थी’ असे करायला हरकत नाही. तिच्या ‘क’ लाही बाधा येणार नाही आणि पुन्हा एकदा ‘बा’च्या आशीर्वादाने मालिका आणखी नवा इतिहास घडवेल..