दिल्लीच्या सीमेवर नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेतली जात आहे. मंगळवारी आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहानाने ट्विट करत शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला. तिच्या या ट्विटनंतर अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी शेतकरी आंदोलनावर व्यक्त झाले. त्यामुळे काही बॉलिवूड कलाकारांनी या हॉलिवूड स्टारवर टीकास्त्र डागलं. त्यामुळे सध्या बॉलिवूड आणि आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी असा सेलिब्रिटींचा वाद रंगला आहे. यामध्येच आता अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने मात्र आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींना पाठिंबा दिला आहे. सोनाक्षीने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट शेअर करत तिचं मत व्यक्त केलं आहे.

“ही गोष्ट खरी आहे की, त्या लोकांना शेतकरी कृषी विधेयक कायदा किंवा शेती क्षेत्रातील काही गोष्टींची माहिती नाही. परंतु, केवळ हीच चिंतेची बाब नाही. जो आवाज उठवण्यात येत आहे, तो व्यक्तींच्या मुलभूत अधिकार, स्वतंत्र इंटरनेट सेवा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्याचबरोबर द्वेष पसरवणारी भाषा आणि शक्ती याविषयी आहे, असं सोनाक्षी म्हणाली.”, असं सोनाक्षी म्हणाली.

वाचा : मतलब कुछ भी! प्रसिद्ध रॅपरने चक्क कपाळावर बसवला हिरा

पुढे ती म्हणते, “प्रसारमाध्यमे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत आहेत, की विदेशातील लोक मुद्दाम आपल्या देशावर नियंत्रण मिळवण्यासाठी हा प्रयत्न करत आहेत. परंतु, तुम्ही एक लक्षात घ्या ते कोणत्याही परग्रहावरुन आलेले लोक नाहीत. तर तेदेखील माणूस आहेत, जे इतरांच्या अधिकारासाठी आवाज उठवत आहेत. या सगळ्या प्रकारामुळे खरं तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं आहे.”

दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनावर भाष्य केल्यामुळे अनेकांनी त्यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. यात अक्षय कुमार, कंगना रणौत, अजय देवगण, सुनील शेट्टी या कलाकारांनी आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींवर टीकास्त्र डागत संपूर्ण देशाने सध्या एकजुटीने लढण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.