प्रेमाला वयाचं, वेळेचं किंवा अन्य कोणत्याही गोष्टीचं बंधन नसतं असं म्हणतात ते अगदी खरं आहे. आयुष्याच्या कोणत्याही वळणावर त्या खास व्यक्तीची अचानक भेट होते. असंच काहीसं अभिनेत्री सोनम कपूरच्या आयुष्यात घडल्याचं पाहायला मिळालं. आनंद आहुजा याच्यासोबत लग्नगाठ बांधलेल्या सोनम आणि आनंदची लव्हस्टोरी एखाद्या परिकथेला शोभावी अशीच आहे. आज सोनमचा वाढदिवस असल्याकारणाने तिची आणि आनंदची नेमकी लव्हस्टोरी कशी आहे हे जाणून घेऊ.
बी- टाऊनमधील सर्वाधिक चर्चिला गेलेल्या लग्नांपैकी सोनम आणि आनंदचं लग्न एक आहे. या दोघांच्या ‘बिग फॅट पंजाबी वेडिंग’नंतर त्यांच्या लव्हस्टोरीची चांगलीच चर्चा रंगली होती. एका दैनिकाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार २०१४ मध्ये सोनम आणि आनंद पहिल्यांदाच एकमेकांना भेटले होते. सोनमची मैत्रीण आणि तिची स्टायलिस्ट पर्निया कुरेशी हिने सोनम आणि आनंदची भेट घडवून आणली. पर्निया आणि आनंद यांच्यात चांगली मैत्री आहे.
View this post on Instagram
‘हिंदुस्तान टाइम्स’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार सोनमची भेट घेतल्यानंतर जवळपास महिन्याभरातच आनंदने तिला प्रपोज केलं होतं. तेव्हापासूनच त्यांच्या ओळखीला एक वेगळं वळण मिळालं. अक्षय कुमारने २०१६ मध्ये हॉलिवूड अभिनेता विल स्मिथ याच्यासाठी आयोजित केलेल्या पार्टीमध्ये आनंदला पहिल्यांदाच सर्वांनी पाहिलं. त्यावेळी त्याच्यावर माध्यमांच्याही नजरा खिळल्या होत्या. त्यानंतर बरेच कार्यक्रम आणि पार्टीमध्ये सोनमसोबत आनंद दिसू लागला. सुट्टीच्या निमित्तानेसुद्धा ही जोडी एकमेकांसोबत काही खास क्षण व्यतीत करु लागली. पण, आतापर्यंतही त्यांनी आपल्या नात्याविषयी कुठेच वाच्यता केली नव्हती. सोनम आणि आनंदने त्यांचं नातं कितीही गुलदस्त्यात ठेवण्याचा प्रयत्न केला असला तरीही सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून मात्र चाहत्यांना या प्रेमकहाणीची कुणकूण केव्हाच लागली होती.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा म्हणू नका किंवा अनिल कपूरचा वाढदिवस, प्रत्येक कार्यक्रमात, कौटुंबिक सोहळ्यात आनंदची हजेरी बरंच काही सांगून गेली. अखेर मे महिन्याच्या सुरुवातीलाच आनंद आणि सोनम या दोघांच्याही कुटुंबियांतर्फे त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यानंतर ८ मे २०१८ मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली.