जगभरामध्ये सध्या चर्चा आहे ती बॉटल कॅप चॅलेंजची. अगदी सामान्यांपासून ते सेलिब्रिटीजपर्यंत अनेकजण बाटलीवरील झाकण बाटली हलू किंवा पडू न देता काढणारे हे चॅलेंज स्वीकारताना दिसत आहेत. ‘बॉटल कॅप चॅलेंज’चे व्हिडीओ अनेक कलाकार सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. नुकताच सोनू सूदनेदेखील हे चॅलेंज स्वीकारले असून त्याने व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. परंतु त्याने हे चॅलेंज अनोख्या पद्धतीने स्वीकारल्याचे दिसत आहे.

सोनू सूदने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर ‘बॉटल कॅप चॅलेंज’ स्वीकारतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सोनू सूद दांड्याला पकडून हवेत चालण्याची अॅक्टिंग करतो आणि बाटलीचे झाकण उडवत चॅलेंज पूर्ण करत आहे. त्याचा हा व्हिडीओ चाहत्यांच्या चांगलाच पसंतीला उतरल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना सोनूने ‘#bottlecapchalleng’ असे लिहिले आहे.

यापूर्वी बॉलिवूडमधील अभिनेता अक्षय कुमार, सिद्धार्थ चतुर्वेदी, टायगर श्रॉफ, कुणाल खेमू, अभिनेत्री सुष्मिता सेनसारख्या इतर कलाकारांनी ‘बॉटल कॅप चॅलेंज’ स्वीकारून व्हिडीओ पोस्ट केले आहेत. हे चॅलेंज स्वीकारण्यात बॉलिवूड कलाकारांसह मराठी कलाकारही मागे नाहीत. सिद्धार्थ चांदेकर, स्वप्निल जोशी आणि अमृता खानविलकर यांनीदेखील अनोख्या ढंगात हे चॅलेंज पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.