समीर जावळे

चाँदनी हे नाव घेतलं की आपल्या समोर येते ती श्रीदेवी. सोज्वळ चेहऱ्याची, निखळ हास्य करणारी अभिनयाने मन मोहून टाकणारी अभिनेत्री होती श्रीदेवी. होती..हे क्रियापद तिच्यानावापुढे लावावं लागतं आहे कारण दोन वर्षांपूर्वीच तिने जगाचा निरोप घेतला आहे. दुबईत लग्न समारंभासाठी श्रीदेवी गेली होती ती परतलीच नाही. दुबईतील हॉटेलमधील रुममध्ये ती फ्रेश होण्यासाठी गेली होती. मात्र बाथटबमध्ये बुडून तिचा मृत्यू झाला. २४ फेब्रुवारी २०१८.. हाच तो दिवस होता ज्यादिवशी बॉलिवूडची ‘चाँदनी’ निखळली.

श्रीदेवी तामिळ, कन्नड आणि तेलगू या तीन भाषांमध्ये काम करणारी अभिनेत्री तर होतीच पण हिंदी सिनेसृष्टी तिचं योगदान कधीही विसरु शकणार नाही. जुली हा श्रीदेवीचा पहिला सिनेमा होता. मात्र यामध्ये ती मुख्य अभिनेत्री नव्हती. जुली सिनेमात विक्रम आणि लक्ष्मी यांच्या मुख्य भूमिका होत्या. या सिनेमात श्रीदेवीने जुलीच्या बहिणीची भूमिका साकारली होती. १९७५ मध्ये हा सिनेमा आला होता. मात्र नायिका म्हणून तिचा पहिला सिनेमा होता तो ‘सोलवा सावन’ श्रीदेवी आणि अमोल पालेकर यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका होत्या. हिंदी सिनेसृष्टी तोपर्यंत बॉलिवूड झालेली नव्हती. १९७९ मध्ये आलेल्या या सिनेमानंतर श्रीदेवीने मागे वळून पाहिलंच नाही.

८० आणि ९० चं दशक तिचं होतं. ‘हिम्मतवाला’, ‘जानी दोस्त’, ‘कलाकार’, ‘सदमा’, ‘तोहफा’, ‘जाग उठा इन्सान’, ‘आग और शोला’, ‘सुहागन’, ‘कर्मा’ या आणि अशा अनेक सिनेमांमधून श्रीदेवीने रुपेरी पडद्यावर राज्य केलं आणि अर्थात प्रेक्षकांच्या मनावरही. हे सगळे चित्रपट व्यावसायिक होतेच तरीही यामध्ये वेगळा सिनेमा ठरला तो ‘सदमा’. या सिनेमात श्रीदेवी आणि कमल हासन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. १८-१९ वर्षांची एक मुलगी पिकनिकला जाते. तिथे झालेल्या अपघातात तिची स्मृती जाते. त्यानंतर तिच्या आयुष्यात काय बदल घडतात तिला कमल हासन कसा भेटतो? शेवटी नेमका सदमा कुणाला बसतो ? या प्रश्नांची उत्तरं सिनेमात मिळतात. सदमा हा श्रीदेवीच्या आयुष्यातला एक माईलस्टोन सिनेमा ठरला आहे. कारण स्मृती गेलेल्या मुलीचा जो अभिनय तिने केला आहे त्याला खरोखर तोड नाही. या सिनेमातील गाणीही खास होती. ‘सुरमई अखियोंमे’ हे गाणं असेल किंवा ‘ऐ जिंदगी गले लगा ले’ हे गाणं असेल या गाण्यांनीही सिनेमाची रंगत वाढवली. या सिनेमाचा शेवट मन हेलावून टाकणारा होता. त्यामुळे व्यावसायिक सिनेमा असूनही हा एक वेगळ्या धाटणीचा सिनेमा म्हणून कायम स्मरणात राहिलेला सिनेमा आहे.

लोरी आता रडवते आहे..असं म्हणाले होते कमल हासन
श्रीदेवीचं निधन झाल्यानंतर कमल हासन यांनी श्रीदेवीच्या आठवणींना उजाळा दिला. त्यावेळी त्यांनी सदमा या सिनेमातील लोरीचा अर्थात सुरमई अखियोंमे या गाण्याचा संदर्भ दिला होता. ही लोरी आज मला रडवते आहे असं कमल हासन म्हणाले होते.

९० च्या दशकात आलेले श्रीदेवीचे चित्रपटही प्रेक्षकांच्या पसंतीस पडले. ‘खुदा गवाह’, ‘लम्हे’, ‘गुरुदेव’, ‘चाँदनी’, ‘चालबाज’ ‘चंद्रमुखी’, ‘रुप की रानी चोरो का राजा’, ‘नगिना’, ‘निगाहे’, ‘हीर राँझा’, ‘लाडला’, ‘मि. इंडिया’, ‘जुदाई’ असे चित्रपट तिने ९० च्या दशकात केले. यश चोप्रा यांच्या चाँदनी या सिनेमाने तिला बॉलिवूडची चाँदनी अशी ओळख दिली. ऋषी कपूर, विनोद खन्ना आणि श्रीदेवी यांच्या प्रेमाचा त्रिकोण असलेली कथा या सिनेमात होती. चाँदनी या सिनेमात श्रीदेवीने परिधान केलेल्या ड्रेसेसची, साड्यांची आणि दागिन्यांची फॅशन त्याकाळी आली होती. त्यावरुनच हा सिनेमा किती चालला असेल याचा अंदाज येतो. ९० च्या दशकात आलेला श्रीदेवीचा चालबाज हा सिनेमा ७० च्या दशकात आलेल्या सीता और गीताचा रिमेक होता. मात्र या सिनेमातही श्रीदेवीने तिच्या अभिनयाने कमाल करुन दाखवली. या सिनेमात तिचा डबल रोल होता. एक सोज्ज्वळ तर दुसरी बोल्ड अशा दोन भूमिका तिने मोठ्या खुबीने साकारल्या. मि. इंडिया सिनेमातले हवा-हवाई हे गाणं आणि काँटे नहीं कटते हे गाणंही असंच हिट ठरलं. खुदा गवाह या सिनेमात श्रीदेवीने अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलं. तिने साकारलेली बेनझीर ही आजही लोकांच्या लक्षात आहे. तर नगिना या सिनेमात तिने साकारलेली भूमिकाही तशीच अजरामर ठरली.

‘रुप की रानी चोरो का राजा’ हा त्याकाळातला बिग बजेट सिनेमा होता. मात्र तिकीटबारीवर हा सिनेमा चालला नाही. या सिनेमाच्या आधी श्रीदेवीची ओळख बोनी कपूरशी झाली होती. या सिनेमापासूनच या दोघांचे प्रेमसंबंध जुळले असं म्हटलं जातं. जुदाई या सिनेमानंतर श्रीदेवीने चित्रपटात काम करणं सोडून दिलं आणि बोनी कपूरशी लग्न केलं. तिचा हा निर्णय अनेकांना धक्कादायक वाटला होता.

नंबर वनची लढाई
श्रीदेवीचं करीअर ऐन भरात असताना त्या काळात तिला टक्कर देणारी अभिनेत्री ठरली माधुरी दीक्षित. असं म्हणतात की या दोघींमध्ये कायमच नंबर वन कोण? अशी स्पर्धा होती. या दोघींनी कधीही या चर्चांकडे फारसे लक्ष दिले नाही. मात्र दोघींनीही पडद्यावर अधिराज्य गाजवलं. या दोघींपैकी सरस कोण होतं हे आजही सांगता येणं कठीण आहे. कारण दोघींचा अभिनय तितकाच वाखाणण्याजोगा आहे.

कमबॅक
जुदाई सिनेमानंतर सिनेसृष्टी सोडलेल्या श्रीदेवीने छोट्या पडद्यावर २००४ मध्ये कमबॅक केलं. ‘मालिनी अय्यर’ या मालिकेत ती झळकली. त्यानंतर प्रेक्षकांना वाटलं की लवकरच श्रीदेवी मोठ्या पडद्यावरही कमबॅक करेल. मात्र तिचा सिनेमा येण्यासाठी आठ वर्षे गेली. २०१२ मध्ये ‘इंग्लिश विंग्लिश’ या सिनेमातून श्रीदेवी मोठ्या पडद्यावर झळकली. त्यात श्रीदेवीने साकारलेल्या भूमिकेचं चांगलंच कौतुक झालं. शशी गोडबोले हे पात्र तिने या सिनेमात साकारलं. हा सिनेमा आणि श्रीदेवीचा अभिनय या दोहोंना समीक्षकांचीही विशेष दाद मिळाली. या सिनेमातलं ‘नवराई माझी लाडाची गं’ हे गाणं आजही प्रेक्षकांच्या ओठांवर आहे. त्यानंतर २०१५ मध्ये पुली या तमिळ सिनेमातही श्रीदेवीने अभिनय केला. तर २०१७ मध्ये प्रदर्शित झालेला ‘मॉम’ हा तिचा शेवटचा हिंदी सिनेमा ठरला.

निरोप..

मॉम या सिनेमानंतर वर्षभरातच म्हणजेच फेब्रुवारी २०१८ मध्ये श्रीदेवीच्या निधनाचीच बातमी आली. कुणाच्याही ध्यानीमनी नसताना तिने अशी एग्झिट घेतली. श्रीदेवी हे जग सोडून गेली त्याला दोन वर्षे होत आहेत. मात्र आजही तिच्या अभिनयाची, सिनेमांची आठवण तितकीच ताजी आहे. एका लग्न समारंभासाठी दुबई या ठिकाणी श्रीदेवी तिच्या कुटुंबीयांसह गेली होती. बोनी कपूर यांनी तिला सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं…बोनी कपूर भेटल्याचा तिला आनंदही झाला. त्यांनी डिनरला जाण्याचं नक्की केलं. ती फ्रेश होण्यासाठी हॉटेलरुमच्या बाथरुममध्ये गेली. मात्र परत आलीच नाही. कारण बाथटबमध्ये बुडून तिचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह तीन ते चार दिवसांनी मुंबईत आणला गेला. तिला अखेरचा निरोप देताना तिला एखाद्या वधूप्रमाणे सजवण्यात आले होते. पांढऱ्या फुलांनी सजवलेल्या ट्रकमधून तिची अंत्ययात्रा निघाली. शांत, निश्चल असलेला तो मृतदेह साक्ष देत होता तिचं अस्तित्व संपल्याची. मात्र मनमनांत श्रीदेवीची आठवण चिरंतन राहिल. हिंदी सिनेसृष्टीला पडलेलं एक सुंदर स्वप्न म्हणून श्रीदेवी कायम स्मरणात राहिल.

समीर जावळे

sameer.jawale@indianexpress.com