|| अनीश प्रभुणे

पंधरा दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘स्पायडरमॅन : फार फ्रॉम होम’ चित्रपटाने मात्र अनेक समीक्षक आणि स्पायडरमॅनचे चाहते यांच्यामध्ये काही प्रमाणात फूट पाडली. अनेकांच्या मतानुसार स्पायडरमॅनचे स्वतंत्र अस्तित्व ‘माव्‍‌र्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’च्या महत्त्वाकांक्षी रचनेमध्ये कुठेतरी हरवून जाते आहे. या चित्रपटाने पुढे नवेच काही घडणार आहे याचे सूतोवाच के ले आहे, यात स्पायडरमॅनकडे सूत्रं येणार की अजून कोणाच्या हातात.. याबद्दल चर्चाना उधाण आले आहे.

story of farmer s son from sangli who successfully completed the mumbai london mumbai double bike journey
सफरनामा : दुचाकीवरून देशाटन
several injured in multiple stabbing-shooting incident
सिडनीतल्या मॉलमध्ये चाकू हल्ला, चार जणांचा मृत्यू, अनेक लोक जखमी; संशियाताला पोलिसांनी ठार केल्याचं वृत्त
Taiwan Earthquake
Taiwan Earthquake : भूकंपाची चाहूल लागताच कुत्र्याने घरातल्या लोकांना केले सावध, तैवान येथील भूकंपाचा व्हिडीओ व्हायरल
Pune Police Arrest Nigerian Woman in Mumbai for Mephedrone Smuggling
मेफेड्रोन तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांची कामगिरी; मुंबईत नायजेरियन महिलेला अटक

१९६२ साली, म्हणजे सुमारे ५७ वर्षांपूर्वी स्टॅन ली आणि स्टीव्ह डिट्को यांनी स्पायडरमॅन या पात्राची ओळख जगाला आपल्या माव्‍‌र्हल कॉमिक्समध्ये पहिल्यांदा करून दिली. पीटर पार्कर, १५-१६ वर्षांचा एक अनाथ मुलगा जो आपले काका बेन आणि काकू मे यांच्यासमवेत राहतोय. यथातथाच परिस्थिती, परंतु अत्यंत कुशाग्र बुद्धीचा आणि धडपडय़ा असा हा मुलगा. एका प्रयोगशाळेतील रेडिओअ‍ॅक्टिव्ह कोळी त्याला चावतो आणि मग.. पुढे ज्या गोष्टी घडतात त्या एखाद्या कॉमिकला अगदी साजेशा अशा. पीटरचे स्पायडरमॅन होणे आणि त्यातून विविध गोष्टींचा गुंता वाढत जाणे ही खरेतर स्पायडरमॅनची गोष्ट.

५७ वर्षे, अनेक कॉमिक्स, कार्टून्स आणि गेल्या १७ वर्षांत तीन वेगवेगळ्या अभिनेत्यांनी साकारलेला असा महत्त्वाचा आणि जगातील सर्वाधिक लोकप्रिय सुपरहिरो आहे. एका १५ वर्षांच्या या मुलाची लोकप्रियता अजूनही, अनेक इतर महत्त्वाच्या नायकांपेक्षा जास्त आहे. असे काय आहे की ज्यामुळे स्पायडरमॅनला एवढी लोकप्रियता मिळाली?

१९६२ असो किंवा त्याआधी (त्यानंतरची अनेक वर्षेसुद्धा) लहान वयातील पात्रं, सुपरहिरो असली तरीही मुख्य पात्रं म्हणून कधीच बघितली जात नसत. यात एक लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे त्या काळात आणि पुढील अनेक वर्षे कॉमिक्सचा वाचक वर्ग हा शाळकरी, कुमारवयीन मुले होती. तरीही, मुख्य पात्रांमध्ये या वाचक वर्गाला आपलेसे वाटेल असे एकही मात्र नव्हते. एखाद्या महत्त्वाच्या नायकाच्या कॉमिक्समध्ये साहाय्यक किंवा छोटे पात्र म्हणून अशी पात्रे वापरली जात. स्पायडरमॅन हे पहिलेच असे पात्र की ज्याचे वय हे वाचकांच्या वयाइतकेच होते. पीटर पार्कर जेव्हा स्पायडरमॅनच्या रूपात गुन्हेगारांना पकडून शहराची कायदा आणि सुव्यवस्था राखतो आहे, तेव्हा दुसरीकडे त्याला  सातच्या आत घरातचा नियम पाळून गृहपाठही पूर्ण करावा लागतोच. पीटर पार्कर आणि स्पायडरमॅन ही दोन वेगवेगळी रूपे सांभाळताना त्याला करावी लागणारी तारेवरची कसरत ही सर्वानाच आपलीशी वाटत होती आणि साहजिकच, त्या पात्राविषयी सहानुभूती किंवा आपलेपण वाटू लागला.

पंधरा दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘स्पायडरमॅन : फार फ्रॉम होम’ चित्रपटाने मात्र अनेक समीक्षक आणि स्पायडर मॅनचे चाहते यांच्यामध्ये काही प्रमाणात फूट पाडली. अनेकांच्या मतानुसार स्पायडरमॅनचे स्वतंत्र अस्तित्व ‘माव्‍‌र्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’च्या महत्त्वाकांक्षी रचनेमध्ये कुठेतरी हरवून जाते आहे. पूर्वीच्या सिनेमांमध्ये असणारी भावनिक ओढ, आपले आणि पात्राचे जुळलेले नाते अलीकडच्या स्पायडरमॅनमध्ये अनेकांना माव्‍‌र्हलच्या रगाडय़ात हरवल्यासारखे वाटले. काहींच्या मते स्पायडरमॅनच्या चित्रपटातील सर्व आवृत्त्यांमध्ये पात्राचे सगळ्यात उत्तम सादरीकरण म्हणजे आत्ताचा स्पायडरमॅन. त्याचबरोबर एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे ‘फार फ्रॉम होम’च्या शेवटी पुढल्या चित्रपटाचे केलेले सूतोवाच. वास्तविक पाहता, माव्‍‌र्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सच्या तिसऱ्या चरणातील हा शेवटचा सिनेमा. ‘अ‍ॅव्हेन्जर्स एंडगेम’मध्ये झालेल्या राडय़ानंतर खरेतर महत्त्वाची कथानकं संपुष्टात आली आहेत. या चित्रपटाने तिसऱ्या चरणाचा शेवट करताना मात्र पुढील चित्रपटात काय घडेल आणि अ‍ॅव्हेन्जर्सच्या नशिबात काय असेल याची एक झलक दाखवली आहे, सगळे काही संपल्यावर, हे काय पुन्हा? असे अनेकांना वाटून गेले आहे.

असे अनेक प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. परंतु यासाठी स्पायडरमॅन चित्रपटाच्या आधीच्या आवृत्त्या आणि आताचा चित्रपट यामधील तौलनिक फरक लक्षात घेणे गरजेचे आहे. टोबी माग्वायर अभिनित आणि सॅम रायमी दिग्दर्शित पहिल्या आवृत्तीमध्ये स्पायडरमॅन हा पहिल्यांदाच मोठय़ा पडद्यावर दिसला होता. त्याच्या तीन चित्रपटांनंतर जवळपास ६-७ वर्षांच्या अंतराने अँड्रय़ू गारफिल्ड अभिनित आणि मार्क वेब दिग्दर्शित अशी दुसरी आवृत्ती आणि त्याचे दोन चित्रपट आले. या दोन्ही चित्रपटांमध्ये स्पायडरमॅनची दुहेरी आयुष्य सांभाळताना होणारी ओढाताण उत्तमरीत्या दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. हे दोन्ही स्पायडरमॅन, कॉलेजमध्ये जाणारे किंवा त्या वयाचे आहेत. चित्रपटाला जाणारा बहुतांश प्रेक्षक ज्या वयाचा आहे, त्याच वयाचे हे नायक होते. कदाचित म्हणूनच, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील प्रेमप्रकरण असो की घरभाडे भरण्यासाठीची आटोकाट धडपड असो, जास्त खरी वाटणे स्वाभाविक होते. अशा रचनेमुळे अनेकांना आधीच्या आवृत्तीमधील पीटर पार्कर आणि स्पायडरमॅन दोन्हीही फार आवडले. परंतु या दोन्ही आवृत्त्यांमधील सर्वच सिनेमे तिकीट खिडकीवर यशस्वी झालेच, असे नाही.

आत्ताचा स्पायडरमॅन हा कॉमिकच्या जास्त जवळ जाणारा आहे. अत्यंत बडबडय़ा असा शाळकरी मुलगा. त्याच्या समस्या या तुलनेने सामान्य वाटाव्यात अशा आहेत. आजकालच्या प्रेक्षकांना तर नक्कीच. परंतु त्याचे लाघवी व्यक्तिमत्त्व हे कोणालाही सहज आपला मित्र करेल असे आहे. अभिनेता टॉम हॉलंडने शाळकरी वयाचा स्पायडरमॅन कॉमिकमध्ये आहे अगदी तसाच्या तसा साकारला आहे. पण तरीही.. त्याच्या चित्रपटांशी फार कमी लोकांना भावनिक आपुलकी निर्माण झाली. अनेकांना, आधी म्हटल्याप्रमाणे स्पायडरमॅन कमी आणि अ‍ॅव्हेन्जर्स जास्त, असे हे सिनेमे वाटत आहेत. या वादात काही मुद्दे लक्षात घेण्यासारखे आहेत. माव्‍‌र्हलआधीचा स्पायडरमॅन आणि माव्‍‌र्हलचे विश्व सुरू असताना झालेला अँड्रय़ू गारफिल्डचा स्पायडरमॅन हे वेगळे का राहिले? माव्‍‌र्हलने सुमारे १९९० च्या दरम्यान, स्वत:ला बुडण्यापासून वाचवण्यासाठी आपली काही पात्रे इतर कंपन्यांना दिली होती. कॉमिक वगळता, इतर कुठल्याही स्वरूपात स्पायडरमॅन वापरण्याचे हक्क सोनी पिक्चर्स कंपनीकडे आहेत.

पहिल्या आवृत्तीच्या आधी स्पायडरमॅन मोठय़ा पडद्यावर कधीच न आल्याने, तो कसा असावा, दिसावा आणि त्याची कथा कशी घडावी याचा अंदाज, ना कर्त्यांना होता ना प्रेक्षकांना होता. कनवाळू मनाचा आणि सर्वसामान्य लोकांप्रमाणेच समस्या असणारा नायक हा अर्थातच सर्वाना भावला. नव्याची नवलाई फार टिकली नाही आणि तिसऱ्या सिनेमानंतर हे चित्रपट बंद झाले. त्यानंतरच्या काही काळात, माव्‍‌र्हलने आपल्या इतर पात्रांना घेऊ न एक एक सिनेमे काढायला सुरुवात केली. सुपरहिरो सिनेमांना परत सुगीचे दिवस आले म्हणून सोनीने पुन्हा एकदा स्पायडरमॅनला जिवंत केले, मात्र हा डाव पुरेसा यशस्वी झाला नाही. माव्‍‌र्हलची गाडी मात्र सुसाट धावत होती. त्यात माव्‍‌र्हल आणि सोनी यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार ‘माव्‍‌र्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’मध्ये स्पायडरमॅनला घेण्यास सोनीने होकार दिला आणि त्या विश्वाचा एक भाग म्हणून स्पायडरमॅनच्या स्वतंत्र सिनेमाला, माव्‍‌र्हलच्या मुख कथानकाची जोड मिळत गेली. स्पायडरमॅनच्या स्वत:च्या जाळ्यापेक्षा अत्यंत गुंतागुंतीचा हा प्रकार आहे.

पुढचा मुद्दा असा की स्पायडरमॅनच्या पहिल्या आवृत्तीला सर्वात महत्त्वाचा फायदा झाला होता तो म्हणजे या व्यक्तिरेखेबद्दल त्यांना काहीच अंदाज नव्हता. स्पायडरमॅन हा भावनिकदृष्टय़ा कितीही जवळचा वाटला तरीही तो अत्यंत उच्च बुद्धिमत्तेचा आणि चलाख आहे हे विसरता कामा नये. पहिल्या आवृत्तीमध्ये या गोष्टीला तशी थेट बगल देण्यात आली. हॉलीवूडबद्दल बोलायचे तर नव्वदीच्या दशकातील फॉम्र्युला वापरून २००० च्या दशकात काढलेली ही चित्रत्रयी होय. दुसऱ्या आवृत्तीमध्ये मात्र यातल्या कुठल्याच गोष्टीचा समन्वय फारसा नीट न साधता आल्याने सगळेच फसले.

आत्ताचा स्पायडरमॅन हा समकालीन आहे. आजच्या मुलांसारखाच तो वागतो आणि निर्णयही तसेच घेतो. चुकीचे असतील पण आपण १५ वर्षांचे आहोत ही मर्यादा त्याला ठाऊक आहे. ‘सिव्हिल वॉर’मध्ये कॅप्टन अमेरिकाला अडवताना ‘सॉरी’ म्हणूनही आपले काम करण्याइतका समंजस तो आहे. अनेकांना असे वाटते की टॉम हॉलंडची आवृत्ती ही फक्त अव्हेन्जर्सच्या टेकूवर आधारित आहे. वस्तुत: आजवरच्या सर्व आवृत्त्यांमधील खरेतर सर्वात सुसंगत अशी ही आवृत्ती आहे. आधीच्या आवृत्त्यांमध्ये तो ‘चिंता करतो विश्वाची’ अशा रूपात दिसतो, इथे हा स्पायडरमॅन विश्वाला वाचवण्यासाठी अ‍ॅव्हेन्जर्स आहेत की, असं सांगून मोकळा होतो. मी बरा नि माझी शाळा बरी.. हे त्याचे व्यवहारी वागणे अनेकांना रुचणारे नाही. पण स्पायडरमॅनचे आधीचे सिनेमे स्वतंत्र होते, आता तो ज्या मोठय़ा विश्वाचा भाग आहे तिथे तो खरंच लहान आहे! प्रेक्षक म्हणून आपल्याला, विशेषत: भारतीय प्रेक्षकांना भावनिक आधार हा तर्कशुद्ध मांडणीपेक्षा अधिक जवळचा वाटतो. आजकालचा प्रेक्षक हा कायम बदल स्वीकारणारा आहे. चित्रपटगृहांमध्ये जाण्याव्यतिरिक्त ओटीटीवर सिनेमे बघणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. प्रेक्षकांचे वय कमी होते आहे. या सर्व गणितांमध्ये आत्ताचा स्पायडरमॅन चपखल बसतो. त्याचे शत्रू, मित्र वयाने मोठे आहेत. पण त्याचा विश्वास असलेले त्याचे मित्र हे शाळेतलेच आहेत. कोणत्याही प्रसंगात आपली भूमिका न सोडता, वय न सोडता वागणारा हा पहिलाच स्पायडरमॅन आहे. स्पायडरमॅनशी जोडली गेलेली एक पिढी अजूनही त्याच्या जुन्या आठवणीत रमलेली आहे, मात्र काळाबरोबर आता हे लाडके पात्र बदलते आहे. त्याला एक संधी द्यायलाच हवी..

राहिला प्रश्न, पुढील सिनेमांचे सूतोवाच करण्याचा. तर स्पायडरमॅन अजून लहान आहे ना? ‘माव्‍‌र्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’मध्ये अजून बऱ्याच गोष्टी सांगणे बाकी आहे. आणि आपला लाडका स्पायडरमॅन त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या लाडक्या सुपरहिरोचा पुढे मोठा आणि रंजक प्रवास असणार आहे, तो काय हे आत्ताच सांगता येणार नाही. परंतु आत्ताचा स्पायडरमॅन हा स्वत:साठी एक नवीन प्रेक्षकवर्ग तयार करण्यात यशस्वीच ठरला आहे यात काहीही शंका नाही.