सुपरहिरोचे वेड लहानथोरांपर्यंत प्रत्येकालाच असते. त्यामुळे कोणत्याही काळामध्ये सुपरहिरोला तितक्याच उत्सुकतेने पाहिले जाते. ‘झी टीव्ही’ आता एका नव्या सुपरहिरोला घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
 ‘आर्यन’ या आगामी सुपरहिरोवर आधारित मालिकेमधून आपल्यातील दिव्यशक्तीची नव्यानं ओळख झालेल्या एका किशोरवयीन मुलाची कथा सांगण्यात येणार आहे. वयाची अठरा वर्षे एका सामान्य मुलाप्रमाणे जगत आलेल्या आर्यनला त्याच्या अठराव्या वाढदिवसाच्या दिवशी त्याच्यातील दिव्यशक्तींची जाणीव होते आणि त्यानंतर तो या शक्तींचा वापर कसा करतो, यावर मालिकेची कथा आधारित आहे. आर्यनचे पात्र साकारणाऱ्या आकर्षण सिंगने या वेळी बोलताना, आर्यनची व्यक्तिरेखा साकारताना आपल्यासमोर स्पायडरमॅनचा आदर्श होता, असे सांगितले.
‘आतापर्यंतच्या सर्व सुपरहिरोंपैकी मला स्पायडरमॅन सर्वात जास्त आवडतो. त्याच्या वागण्यात, व्यक्तिमत्त्वामध्ये एक निरागसता आहे. आर्यन आणि त्याच्या बाबतीत हाच एक समान दुवा आहे’, असे तो सांगतो. अर्थात सुपरहिरोचा विषय निघाल्यावर त्याच्या शक्तींबाबत बोलणे योगायोगाने येणारच. ‘आर्यन रक्षक कुटुंबातील आहे. त्याला लांब उडय़ा मारता येतात. एका इमारतीवरून दुसऱ्या इमारतीवर तो सहज उडी मारू शकतो. तसेच लांब अंतरावरूनसुद्धा दोन व्यक्तींमध्ये काय बोलणे चालू आहे, हे त्याला ऐकू येते. इतर सुपरहिरोंप्रमाणे यातही आर्यनला त्याचे प्रेम गवसले आहे. आर्यन एका रेडिओ सेंटरमध्ये काम करतो आहे, कारण या रेडिओ सेंटरच्या मालकाच्या मुलीवर त्याचा जीव जडला आहे आणि म्हणून इच्छा नसतानाही तो हे काम करतो आहे,’ अशी आपल्या सुपरहिरो व्यक्तिरेखेची माहिती आकर्षणने दिली.