कलादिग्दर्शनाच्या क्षेत्रात चिकाटी आणि अभ्यासूवृत्ती महत्त्वाची असल्याचे मत प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी नुकतेच व्यक्त केले. डॉ. व्ही. शांताराम मोशन पिक्चर ट्रस्टतर्फे चित्रकर्मी, अभ्यासक यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सिने कल्चरल सेंटरच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
आपल्या कलादिग्दर्शनाचा प्रवास उलगडताना देसाई यांनी या क्षेत्रात कराव्या लागणाऱ्या मेहनतीची आणि चिकाटीची उदाहरणे दिली. ‘१९४२ ए लव्ह स्टोरी’ या चित्रपटाला मिळालेला कलादिग्दर्शनाचा पुरस्कार आपल्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला, असेही देसाई यांनी सांगितले.
देसाई यांनी ‘चाणक्य’, ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या मालिका तसेच ‘हम दिल दे चुके सनम’, ‘लगान’, ‘देवदास’ आदी चित्रपटांच्या सेट्ससाठीचे कलादिग्दर्शन केले होते. या वेळी त्या संदर्भातील चित्रफीतही दाखविण्यात आली. तसेच सेट्सच्या निर्मितीचे प्रात्यक्षिकही देसाई यांनी या वेळी सादर केले.
सांस्कृतिक कार्यसंचालनालयाचे संचालक आशुतोष घोरपडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या उपक्रमाचे संकल्पनाकार हर्षल बांदिवडेकर यांनी प्रास्ताविक तर अमित भंडारी यांनी सूत्रसंचालन केले. व्ही. शांताराम मोशन पिक्चर्स ट्रस्टचे किरण शांताराम या वेळी उपस्थित होते.