आपल्या बुलंद आवाजाच्या गायकीने रसिकांना मंत्रमुग्ध करणारे प्रख्यात गायक सुखविंदर सिंग यांच्या अभिनयाची नवी इनिंग लवकरच पहायला मिळणार आहे. राठौड फिल्म्स प्रोडक्शनच्या आगामी ‘लॉर्ड ऑफ शिंगणापूर’ या मराठी चित्रपटात त्यांचे हे वेगळं रूप पहाता येणार आहे. सुखविंदर सिंग यांनी गायलेल्या ‘देवा शनि देवा’ या गीतावर ते स्वतः परफॉर्मन्स करताना दिसतील.
सूफी गायकीमध्ये देवासमोर आपली कला सादर करताना पायात घुंगरू बांधून ‘अल्ता’ लावण्याची प्रथा आहे. या गाण्यातही ही प्रथा पाळली आहे. या गाण्यासाठी खास काठेवाडी पोशाख सुखविंदर सिंग यांनी परिधान केला आहे. शनी महात्म्यावर आधारित या चित्रपटात गायनाबरोबर परफॉर्मन्स करण्याची मिळालेली संधी माझ्यासाठी निश्चितच आनंददायी होती असं सांगत शनीदेवाच्या आराधनेचे हे गीत प्रत्येकाच्या मनाला भिडेल अशी खात्री सुखविंदर सिंग यांनी व्यक्त केली. दैवी प्रचीतीचा अनुभव देणारा हा चित्रपट माझ्यासाठी जसा खास आहे तसा तो प्रेक्षकांसाठी ही असेल अशी आशा ही सुखविंदर सिंग यांनी व्यक्त केली. फारुख बरेलवी यांनी लिहिलेल्या या गीताला फरहान शेख यांनी संगीत दिलं आहे.
निर्माता-दिग्दर्शक राज राठौड यांनी ‘लॉर्ड ऑफ शिंगणापूर’ या शनी महात्म्यावर आधारित चित्रपटातून शनीदेवाचे एक वेगळं सकारात्मक रूप भक्तांच्या समोर आणलं आहे. एखादयाच्या राशीत शनीची साडेसाती सुरु झाली म्हणजे काहीतरी विपरीत अथवा अघटित घडणार असा प्रत्येकाचा समज असतो. मात्र शनीच्या साडेसातीचा काळ जसा उतरती कळा दाखवतो तसाच तो आपल्याला बरंच काही शिकवत असतो. शनी देवाचं हे वेगळं रूप भक्तांना आत्मविश्वास आणि सामर्थ्य देणारं आहे. ‘लॉर्ड ऑफ शिंगणापूर’ चित्रपटातून याचाच प्रत्यय प्रेक्षकांना घेता येईल.
या चित्रपटात शनिदेवाची भूमिका अभिनेता मिलिंद गुणाजी यांनी साकारली असून सुधीर दळवी, मनोज जोशी, वर्षा उसगांवकर, राहुल महाजन, आशुतोष कुलकर्णी, पंकज विष्णू, अनिकेत केळकर, मिलिंद जोशी, दीपक शर्मा, कांचन पगारे, वैभवी, ब्रिजेश हिरजी, यशोधन राणा, यश चौहान, वैभव बागडे, सागर पंचाल, शिशी गिरी, मनमौजी, आकाश भारद्वाज, अॅण्ड्रीया अशी कलाकारांची तगडी फौज यात आहे. राठौड फिल्म्स प्रोडक्शनचा हा सिनेमा ८ जानेवारीला चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे.