भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील शेवटच्या कसोटी सामन्यात ऐतिहासिक विजयाची नोंद करत भारताने मालिका खिशात घातली. अनेक आव्हानांचा सामना करत भारताने मिळवलेल्या विजयानंतर देशभरात जल्लोष सुरू आहे. सामान्य माणसांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत सर्वांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान बॉलिवूड अभिनेते, भाजपा खासदार सनी देओल यांनी देखील भारत झिंदाबाद म्हणत आपला आनंद व्यक्त केला.

Proud of #TeamIndia What an incredible win!#IndVsAus https://t.co/wfybDnKlOT

— Bobby Deol (@thedeol) January 19, 2021

“भारतीयांना कधीही कमी समजू नका, भारत झिंदाबाद” अशा आशयाचं ट्विट करत सनी देओल यांनी आपला आनंद व्यक्त केला. त्यांच्यासोबतच बॉबी देओल, रितेश देशमुख, सुमित राघवन यांसारख्या अनेक बॉलिवूड कलाकारांनीही भारतीय क्रिकेट संघावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्यांची ही ट्विट्स सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.

‘गाबा’च्या मैदानावरील ऑस्ट्रेलियाचा अजिंक्य विजयरथ रोखत भारतानं ऐतिहासिक विजयाची नोंद केली. सलामीवीर फलंदाज शुबमन गिल (९१), अनुभवी चेतेश्वर पुजारा (५६) आणि झटपट धावा काढणाऱ्या ऋषभ पंत (८५*) यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारताने चौथ्या कसोटी सामन्यात तीन गड्यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयासाह भारताने बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका २-१ ने जिंकली आहे.