अभिनेता सुशांत सिंह राजपूतचं निधन होऊन एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. मात्र आजही चाहत्यांमध्ये आणि त्याच्या मित्रपरिवारात त्याच्याविषयीच्या चर्चा रंगतात. आज (२४ जुलै) सुशांतचा अखेरचा चित्रपट दिल बेचारा प्रदर्शत होणार आहे. त्यामुळे कलाविश्वातील अनेक जण सुशांतच्या आठवणींना उजाळा देत आहेत. यामध्येच राज बब्बर यांच्या लेकीने जुही बब्बरने सुशांतच्या पहिल्या नाटकातील फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चिला जात आहे.
“माझ्या दोन नाटकांमध्ये सुशांत होता. २००७ साली प्रदर्शित झालेलं ‘पुकार’ आणि त्यानंतर विनोदी नाटक ‘दौडा दौडा भागा भागा सा’ या दोन नाटकांमध्ये सुशांतने काम केलं होतं. विशेष म्हणजे या नाटकांपैकी एका नाटकाच्या वेळी बालाजी फिल्म्सचे कास्टींग डिरेक्टर सुशांतला खास शोधत आले होते. विशेष म्हणजे बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर सुद्धा सुशांत नाटकातील प्रत्येक व्यक्तीच्या संपर्कात होता”, असं जुही बब्बरने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
पुढे ती म्हणते, “कायम कामात व्यस्त असलेला सुशांत कायम मी एक फोन केला की एक दूजे थिएटर ग्रुपच्या प्रत्येक कार्यक्रम आणि शोमध्ये सहभागी व्हायचा. मला दीदी म्हणायचा. मला कायम म्हणायचा दीदी तू माझी पहिली दिग्दर्शिका आहे. सुशांत तुला पाहून कायम आनंद वाटायचा. हे काय करुन घेतलंस तू? का केलंस? असं तुझी कायम आठवण येईल”.
दरम्यान, सुशांतने २००८ साली अभिनयाची सुरुवात केली. किस देश में है मेरा दिल या मालिकेतून त्याने कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर पवित्र रिश्ता या मालिकेमुळे त्याला खऱ्या अर्थाने नावलौकिक मिळाला. विशेष म्हणजे या मालिकेतील अभिनयाच्या जोरावर त्याने थेट बॉलिवूडपर्यंत मजल मारली.