अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचं निधन होऊन आता एक आठवडा उलटला आहे. मात्र या धक्क्यातून अद्यापही त्याचे कुटुंबीय आणि चाहते सावरले नाहीत. अजूनही सोशल मीडियावर सुशांतच्या नावाची चर्चा सुरु आहे. यामध्येच सुशांतच्या कुटुंबीयांनी त्यांच्या आठवणी जपून ठेवण्यासाठी आणि त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार ते, सुशांतच्या नावाने एक फाऊंडेशन सुरु करणार असून त्या अंतर्गत कला, क्रीडा किंवा तंत्रज्ञान क्षेत्रात काम करु इच्छिणाऱ्यांसाठी मदत करणार आहेत.

काही दिवसांपूर्वी सुशांतच्या कुटुंबीयांनी एका पत्राच्या माध्यमातून सुशांतविषयीच्या भावना व्यक्त केल्या होत्या. यावेळी त्याने सुशांत सिंह राजपूत फाऊंडेशन सुरु करणार असल्याची माहिती दिली. सुशांतला कला, क्रीडा आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये विशेष रस होता. त्यामुळेच या क्षेत्रामध्ये करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुशांत सिंह राजपूत फाऊंडेशनच्या माध्यमातून मदत केली जाणार आहे.

“त्याच चाहत्यांवर प्रचंड प्रेम होतं. तुम्ही सुद्धा आमच्या मुलांवर जे प्रेम केलं, त्यासाठी मनापासून तुमचे आभार. आता तो आपल्यासोबत नाहीये म्हणूनच त्याच्या आठवणी जतन करण्यासाठी आम्ही सुशांत सिंह राजपूत फाऊंडेशनची स्थापना करणार आहोत. या फाऊंडेशनच्या अंतर्गत आम्ही त्याला आवडत असलेल्या कलाविश्व, तंत्रज्ञान, आणि क्रीडा या क्षेत्रांमध्ये करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करणार आहोत. तसंच पाटणामधील त्याच्या घरात सुशांतचं स्मारक उभारण्यात येणार असून येथे त्याच्या काही आवडत्या वस्तूंचा संग्रहदेखील करण्यात येणार आहे. यात त्याची पुस्तके, दुर्बिणी, फ्लाइट सिम्युलेटर, गिटार, फर्निचर यांसारख्या काही गोष्टींचा समावेश असेल. तसंच सुशांतचे असंख्य चाहते होते. त्यामुळे सुशांत आणि त्यांच्यातील प्रेम असंच कायम ठेवण्यासाठी आम्ही त्याचं इन्स्टाग्राम, ट्विटर अकाऊंटदेखील लिगेसी अकाऊंटप्रमाणे सुरु ठेवणार आहोत, असं सुशांतच्या कुटुंबीयांनी शेअर केलेल्या पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, सुशांतचं सोशल मीडिया अकाऊंटदेखील सुरु ठेवणार असल्याचा निर्णय त्याच्या कुटुंबीयांनी घेतला आहे. सुशांतचे त्याचं इन्स्टाग्राम, ट्विटर अकाऊंट लिगेसी अकाऊंटप्रमाणे सुरु ठेवलं जाणार आहे.