अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येला दीड महिना उलटून गेला आहे. सातत्यानं चर्चेत असलेल्या घटनेत आता सुशांतच्या कुटुंबीयांनी त्यांची गर्लफ्रेंड व अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या प्रकरणी राजकीय नेतेही सातत्यानं भाष्य करत आहेत. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी याप्रकरणी चर्चा करून कारवाई करण्याची मागणी केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी निष्पक्षपणे चौकशी करण्याचं आश्वासनं दिलं आहे.

चिराग पासवान यांनी एएनआयला बोलताना याविषयी माहिती दिली. “मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो. याप्रकरणात जी नावं समोर येतील, मग ती प्रतिष्ठित असो वा छोटी, सगळ्यांची चौकशी केली जात आहे. आदित्य चोप्रा असो वा महेश भट्ट किंवा करण जोहर या सगळ्यांचीच चौकशी केली जात आहे. या सगळ्यांची सध्या चौकशी केली जात आहे. इतक्या लवकर निष्कर्ष काढणं घाईचं होईल मात्र, जर कोणाकडे बोट दाखवलं जात असेल तर त्यांचीही निःपक्षपातीपणे त्याची चौकशी केली जाईल. जर दोषी आढळले, तर कठोर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आपल्याला दिल्याचं चिराग पासवान म्हणाले.

मागील दीड महिन्यांपासून सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा मुंबई पोलिसांकडून तपास केला जात आहे. या प्रकरणाला बुधवारी नवं वळणं मिळालं. सुशांतसिंहचे वडील के.के. सिंह यांनी त्यांची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती विरोधात पाटणा पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. “माझ्या मुलाला सर्व काही सोडून केरळला जाऊन आपल्या मित्रासोबत शेती करण्याची इच्छा होती. पण रियाने त्याला रोखलं. आपलं ऐकलं नाही तर मेडिकल रिपोर्ट मीडियामध्ये प्रसिद्ध करणार आणि मानसिक स्थिती योग्य नसल्याचं सांगणार अशी धमकी तिने दिली होती. जेव्हा सुशांत आपलं ऐकत नसल्याचं आणि त्याच्या बँक खात्यात पैसे नसल्याचं लक्षात आलं तेव्हा रियाने आता त्याचा काही उपयोग नाही असा विचार केला,” असा आरोप सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर केला आहे.