भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या जीवनपटात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने रविवारी (१४ जून) आपल्या मुंबईतील घरात आत्महत्या केली. वांद्रे येथील राहत्या घरात त्याने गळफास लावून घेतला आणि जीवन संपवलं. सुशांतच्या मृत्यूचा साऱ्यांनाच धक्का बसला. अनेकांनी सुशांतसोबतच्या विविध आठवणी सोशल मीडियावर शेअर करत त्याला श्रद्धांजली वाहिली. सुशांत हा केवळ एका चांगला अभिनेताच नव्हता, तर ते एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. सध्या सुशांतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात त्याला एक विशेष कला अवगत असल्याची चर्चा रंगली आहे.

सुशांत सिंग राजपूतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये सुशांत एकाच वेळी चक्क दोन्ही हातांनी लिहीताना दिसतो आहे. सुशांतचा हा व्हिडीओ जुना आहे. या व्हिडीओमध्ये तो दोन्ही हातांनी लिहीताना दिसत असून तो आरशासारखे लिखाण (Mirror Writing) करताना दिसतो आहे. सुशांतच्या या व्हिडीओनंतर त्याला दोन्ही हातांनी एकाच वेळी लिहिण्याची कला (Ambidextrous) अवगत असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

दरम्यान, इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अ‍ॅपने सुशांतच्या अकाऊंटमध्ये एक खास बदल केला. सुशांतचा मृत्यू रविवारी झाला. त्यानंतर त्याची शेवटची पोस्ट किंवा गेल्या काही दिवसातील त्याचे सोशल मीडियावरील जीवन यावरून अनेक चर्चा रंगल्या होत्या. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील फॉलोअर्सची खूप संख्याही खूप वाढली होती. त्यानंतर इन्स्टाग्रामने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर Remembering असा टॅग अ‍ॅड केला. इन्स्टाग्रामकडून Remembering हा टॅग प्रत्येक मृत व्यक्तीच्या अकाऊंटला दिला जात नाही. काही खास लोक आणि चिरकाळ स्मरणात राहाव्यात अशा व्यक्तींच्याच निधनानंतर त्यांच्या अकाऊंटला हा टॅग दिला जातो.