छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या चाहत्यांसाठी एक दु:खद बातमी आहे. या मालिकेच्या टीममधील एका सदस्याचं निधन झालं आहे. मालिकेला यशाच्या शिखरावर पोहोचवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे मेकअप आर्टिस्ट आनंद परमार यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.
८ फेब्रुवारी रोजी आनंद परमार यांचे निधन झाले. रविवारी सकाळी १० वाजता मुंबईतल्या कांदिवली येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या १२ वर्षांपासून आनंद हे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेशी जोडले गेले होते. मालिकेतील सर्व कलाकारांचे मेकअप तेच करायचे. आनंद यांच्या निधनाची बातमी मिळताच मालिकेच्या संपूर्ण टीमवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर मालिकेची शूटिंग एका दिवसासाठी थांबवण्यात आली.
मालिकेत मिसेस हाथी यांची भूमिका साकारणारी अभिनेत्री अंबिका रंजनकर यांनी सोशल मीडियावर आनंद परमार यांचा फोटो पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.
याआधी २०१८ मध्ये मालिकेत डॉक्टर हाथीची भूमिका साकारणारे कवी कुमार आझाद यांचे निधन झाले होते. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं होतं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 10, 2020 11:23 am