22 September 2019

News Flash

‘तारक मेहता..’मध्ये ही अभिनेत्री साकारणार आत्माराम भिडेच्या मुलीची भूमिका

सोनूच्या भूमिकेसाठी निर्मात्यांनी गेल्या सहा महिन्यात शेकडो मुलींचे ऑडीशन घेतले होते. त्या शेकडोंमधून अखेर या अभिनेत्रीची निवड करण्यात आली आहे.

तारक मेहता का उलटा चष्मा या लोकप्रिय मालिकेत एका नवीन अभिनेत्रीचे आगमन होणार आहे. या अभिनेत्रीचे नाव पलक सिधवानी असे असुन यापुढे ती सोनूच्या भूमिकेत दिसेल. मालिकेत सोनू ही माधवी व आत्माराम भिडे यांची मुलगी आहे. याआधी ही व्यक्तिरेखा अभिनेत्री निधी भानूशाली साकारत होती. परंतु उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणार असल्याचे कारण देत तिने या व्यक्तिरेखेला कायमचा रामराम ठोकला आहे.

सोनूची भूमिका साकारण्यासाठी निर्माते एका नवीन अभिनेत्रीच्या शोधात आहेत, अशा चर्चा गेल्या काही काळात टीव्ही मनोरंजन क्षेत्रात रंगल्या होत्या. परंतु निर्मात्यांनी सातत्याने त्या फेटाळून लावल्या होत्या. परंतु पलक सिधवानीचे नाव जाहिर झाल्यानंतर त्या चर्चा खऱ्या होत्या असे निर्मात्यांनी मान्य केले आहे. सोनू ही तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेतील सर्वात महत्वाच्या व्यक्तिरेखेंपैकी एक आहे. या भूमिकेसाठी निर्मात्यांनी गेल्या सहा महिन्यात शेकडो मुलींचे ऑडीशन घेतले होते. त्या शेकडोंमधून पलक सिधवानीची निवड करण्यात आली आहे.

“मी याआधी काही टीव्ही जाहिराती व लघुपटांमध्ये काम केले होते. मात्र त्यांचे स्वरुप फार लहान होते. तारक मेहता ही माझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठी संधी आहे. त्यासाठी लागणारी मेहनत मी करेन आणि संधीचे सोने करेन” असे मत पलक सिधवानीने व्यक्त केले आहे. निधी भानूशालीच्या आधी अभिनेत्री झील मेहता सोनूची व्यक्तिरेखा साकारत होती. परंतु तिने देखील काही व्यक्तिगत कारणे देत तारक मेहता या मालिकेला रामराम ठोकला होता. आता चाहतेही सोनूच्या भूमिकेत पलक सिधवानीला पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

First Published on August 22, 2019 5:02 pm

Web Title: taarak mehta ka ooltah chashmah palak sidhwani sonu nidhi bhanushali jheel mehta mpg 94