‘विकी डोनर’, ‘बधाई हो’, ‘अंधाधून’ अशा दमदार चित्रपटांमध्ये भूमिका साकारणारा अभिनेता आयुषमान खुराना बॉक्स ऑफीसवर यशस्वी वाटचाल करतोय. ‘विकी डोनर’ या चित्रपटानंतर त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. पण एकीकडे तो अभिनेता म्हणून पुढे जात असतानाच त्याच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र बऱ्याच अडचणींना त्याला सामोरं जावं लागत होतं. ‘माझ्या मनात अनेकदा आयुषमानला सोडण्याचा विचार आला होता,’ असा खुलासा त्याची पत्नी ताहिरा कश्यपने केला आहे.
ताहिरा आणि आयुषमान बालपणापासून एकमेकांना ओळखतात. मैत्रीचं हळूहळू प्रेमात रुपांतर झालं आणि दोघांनी विवाहबंधनात अडकत आयुष्यभर एकमेकांची साथ देण्याचा निर्णय घेतला. हे सर्वकाही आयुषमानच्या बॉलिवूड पदार्पणापर्यंत व्यवस्थित सुरू होतं. पण ताहिराला नंतर आयुषमानच्या काही गोष्टी खटकू लागल्या. ‘स्पॉटबॉय ई’ला दिलेल्या मुलाखतीत ताहिराने सांगितले, ‘मला आयुषमानचे ऑनस्क्रीन किसिंग सीन पटत नव्हते. त्या गोष्टींचा मला खूप त्रास होत होता. त्यावेळी मी गरोदर होती. चित्रपटांमुळे त्याला माझ्यासाठी वेळ नव्हता आणि ही गोष्ट समजून घेण्याची ताकद माझ्यात नव्हती. तो मला फसवत नाहीये हे मला माहीत होतं. पण आमच्यात तेव्हा चांगलाच दुरावा आला होता. नात्यात अनेकदा मी हार पत्करली होती. पण त्याने कधीच हार मानली नाही.’ काही महिन्यांपूर्वी ताहिराला कॅन्सरचे निदान झाले होते. या कठीण परिस्थितीत आयुषमान तिच्यासोबत कायम होता. किंबहुना याच परिस्थितीने आम्हाला खंबीर बनवलं असं ती म्हणते.
आयुषमान आणि ताहिराला दोन मुलं आहेत. ताहिरा लवकरच दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहे. तर आयुषमानकडेही बऱ्याच चित्रपटांचे ऑफर्स आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 16, 2019 6:34 pm