बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची ‘तांडव’ ही सीरिज सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. हिंदू देवदेवतांचा अपमान केल्याप्रकरणी ही सीरिज वादाच्या भोवऱ्यात सापडली असून अनेकांनी तिच्यावर टीकास्त्र डागलं आहे. ही सीरिज बॅन करण्याची मागणी होत असतानाच आता कलाविश्वातील सेलिब्रिटीदेखील या सीरिजविषयी व्यक्त होऊ लागले आहेत. सध्या सोशल मीडियावर विनोदवीर राजू श्रीवास्तवचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये राजू श्रीवास्तवने नाराजी व्यक्त करत तांडववर टीकास्त्र डागलं आहे.

राजू श्रीवास्तवचा हा व्हिडीओ फिल्ममेकर विनोद कापडी यांनी शेअर केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी या व्हिडीओला हटके कॅप्शन दिलं आहे. जेव्हा विनोद त्रासदायक ठरतो असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे. राजूचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

राजू श्रीवास्तवने अनेकदा त्याच्या विनोदांमध्ये देवी-देवतांच्या नावाचा उल्लेख केला आहे. त्यामुळे राजूने तांडवविषयी बोलणं योग्य नसल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. आज राजू श्रीवास्तव तांडव सीरिजवर भाष्य करत आहेत. त्यांची आस्था आता जागी झाली आहे. त्यामुळेच त्यांचा एक व्हिडीओ आम्ही शोधून काढला आहे, ज्यात ते स्वत: रामायण आणि महाभारतावर भाष्य करताना दिसत आहेत, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.

एका नेटकऱ्याने उत्तर प्रदेश पोलीस आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना टॅग करत राजू श्रीवास्तव याच्यावर टीका केली आहे. या व्यक्तीव्यतिरिक्त रामायणाविषयी इतकं चुकीचं कोणीही बोलू शकत नाही. श्री रामांचा केलेला हा अपमान तुम्हाल योग्य वाटतो का?

व्हिडीओमध्ये नेमकं काय म्हणाला राजू श्रीवास्तव?

प्रत्येक वेळी वेब सीरिजमध्ये सैफ अली खान वारंवार असंच काहीसं करतो. त्याला कोणी अडवणारं नाही, कोणताही कायदा नाही. हिंदू धर्म सहिष्णू आहे. हिंदू लोक मोठ्या मनाचे आहेत. त्यामुळे माफ करतात. पण आता वेळ आली आहे..हिंदूंनो जागे व्हा, तुम्हाला जागं होण्याची गरज आहे. आता मागणी होते की सीरिजमधील हे दृश्य हटवण्यात यावं? केवळ दृश्य हटवून काही होणार नाही. यासाठी कठोर शिक्षा झाली पाहिजे. असा कायदा करायला हवा की परत कोणी असं करणार नाही.