अभिनेता अजय देवगनचा आगामी चित्रपट ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’चा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट तान्हाजी मालुसरे यांनी केवळ ५०० मावळ्यांच्या मदतीने कोंढाणा किल्ल्यावर गाजवलेल्या पराक्रमावर आधारित आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरवर प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. परंतु संभाजी ब्रिगेड या संघटनेने मात्र ट्रेलरबाबत आपला आक्षेप नोंदवला आहे.
संभाजी ब्रिगेडने ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’मधील ‘या’ दृष्यांवर आक्षेप नोंदवले

१) छञपती शिवाजी महाराजांना हाताखालील लाकूड फेकून मारणारा व्यक्ती कोण दाखवला आहे ?

२) अभिनेञी काजोलच्या तोंडी जे संवाद आहेत. त्यावरुन छञपती शिवरायांची अनऐतिहासिक अशी गो-ब्राम्हणप्रतिपालक ही उपाधी परत जनमानसावर ठसवण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.

३) छञपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या भगव्या झेंड्यावर ॐ दाखवून, छञपती शिवरायांची सर्वधर्म समावेशक प्रतिमा पुसून छञपतींचे हिंदुपतपादशाह अशी धार्मिक प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न दिसून येत आहे.

हे आक्षेप संभाजी ब्रिगेड या संघटनेने व्यक्त केले आहेत. तसेच त्यांनी याबाबत निर्माता अजय देवगन व दिग्दर्शक ओम राउतकडे खुलासा देखील मागितला आहे. त्यांच्या मते “ऐतिहासिक विषयावर चिञपट तयार करायला हवे, परंतु चित्रपटाच्या नावाखाली ऐतिहासिक प्रसंगाचे किंवा व्यक्तींचे विकृतीकरण करण्याच्या प्रयत्न केल्यास ते खपवून घेतले जाणार नाही.”

आणखी वाचा- ‘हा’ मराठमोळा दिग्दर्शक उलगडणार रुपेरी पडद्यावर तान्हाजी मालुसरे यांची शौर्यगाथा

या चित्रपटात अभिनेता अजय देवगण तानाजींची भूमिका साकारत असून अभिनेत्री काजोल तान्हाजी मालुसरे यांची पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांची भूमिका साकारणार आहे. अभिनेता सैफ अली खान राजपुत मोघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर मराठमोळा अभिनेता शरद केळकर शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे तर राजमाता जिजाऊंची भूमिका पद्मावती राव वटवणार आहेत.