तन्मय भट्ट याने सोशल मीडियावर प्रसारित केलेल्या ‘सचिन व्हर्सेस लता मंगेशकर’ या चित्रफितीने माध्यम जगतात तसेच मनोरंजन उद्योगात खळबळ उडाली. तन्मय याने हे उद्योग काही पहिल्यांदा केलेले नाहीत. याअगोदरही त्याच्या चित्रफितीने वाद निर्माण झाले होते. एखाद्या व्यक्तीवर शारीरिक आणि शाब्दिक वार केले किंवा दूरचित्रवाहिन्यांवरील ‘शो’मधून पुरुषांनी स्त्रीच्या वेषात येणे, कमरेखालचे विनोद करणे किंवा अश्लील बोलणे यालाच ‘विनोद’ म्हणतात का, असा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्या निमित्ताने..

गेल्या काही वर्षांत भारतातील प्रसारमाध्यमांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली असून दूरचित्रवाहिन्यांवरील विविध वाहिन्यांची संख्याही पाचशे-सहाशेच्या पुढे गेली आहे. ‘फेसबुक’, ‘ट्विटर’, ‘यु टय़ूब’ यासारख्या सोशल मीडियाचा वापरही मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. प्रत्येक वाहिनीवर किमान एक तरी ‘कॉमेडी शो’ असतोच असतो. अशा कार्यक्रमातून प्रेक्षकांची किती ‘करमणूक’ होते हा वेगळा प्रश्न आहे. कारण विनोदाच्या नावाखाली त्या शोमधून जे काही सादर होते ते काही अपवाद वगळता शिसारी येणारे, ओंगळवाणे, ओढून ताणून विनोद करणारे, जबरदस्तीने हसू आणणारेच असते. बरेचदा विनोद निर्मिती करण्यासाठी पुरुषाला स्त्री वेशात सादर करणे, संवादातून अश्लील किंवा कमरेखालचे विनोद करणे असे प्रकार सर्रास पाहायला मिळतात. आत्तापर्यंत यात हिंदी वाहिन्यांवरील कार्यक्रमांचा सहभाग जास्त होता. पण आता त्या ‘हवे’वर मराठी वाहिन्यांनीही आपले हात धुऊन घेत आहेत. ही ‘हवा’ फार काळ टिकणारी नाही हे माहिती असूनही विनोदाची एक्स्प्रेस सुस्साट सुटलेली आहे. ‘प्रेक्षकांना हेच आवडते’ असा सोयीस्कर (गैर) समज करून घेऊन विनोदाचे दळण दळले जात आहे.
दूरचित्रवाहिन्यांवरील या ‘शो’ प्रमाणेच विविध पुरस्कार वितरण सोहळ्यातही सूत्रसंचालन करताना किंवा त्यात सादर होणाऱ्या छोटय़ा छोटय़ा संहितांमधूनही असे सुमार दर्जाचे विनोद पाहायला मिळतात किंवा अकारण एखाद्याची नालस्ती होईल अशी वक्तव्ये केली जातात. मध्यंतरी एका मराठी वाहिनीवरील पुरस्कार वितरण सोहोळ्यात अशा दर्जाहीन, व्यक्तिगत शेरेबाजीचा ‘पुष्कळ’ ‘प्रसाद’ एका अभिनेत्याला मिळाला होता. त्याची चर्चाही तेव्हा प्रसारमाध्यमातून झाली होती. वाहिन्यांवरील ‘कॉमेडी शो’ किंवा पुरस्कार सोहळ्यातील सूत्रसंचालनापुरते मर्यादित असलेले हे लोण आता विविध सोशल मीडियातून व्यक्त व्हायला लागले आहे. अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे म्हणजे एखाद्याची वैयक्तिक स्तरावर आणि अत्यंत खालच्या पातळीवर येऊन निंदानालस्तीच केली पाहिजे असा त्याचा अर्थ होत नाही. एखाद्याच्या व्यंगावर विनोद करणे, विशिष्ट शारीरिक अवयवांवरून व अश्लील संवादातून कमरेखालचे विनोद करणे म्हणजेही विनोद असू शकत नाही.
तन्मय भट्ट प्रकरणावरून हेच पुन्हा एकदा समोर आले आहे. सचिन तेंडुलकर व लता मंगेशकर हे ‘भारतरत्न’ आहेत म्हणून त्यांचा असा अपमान करणे किंवा त्याची चित्रफीत तयार करून ती प्रसारित करणे योग्य नसल्याची भूमिका घेण्यात येत आहे. तन्मय भट्ट याने ज्या प्रकारे व ज्या शब्दात सचिन आणि लता यांची टिंगल केली आहे ते निषेधार्थच आहे. पण हे फक्त ‘सेलिब्रेटीं’पुरतेच मर्यादित राहू नये. आत्मसन्मान हा सर्वसामान्य माणसांनाही असतो. त्यांनाही याचा फटका बसू नये. अनेकदा चित्रपट किंवा मालिका यातून समाजातील एखाद्या विशिष्ट समुदायाबद्दल भाष्य केले जाते किंवा त्यांचे विनोदी पद्धतीने सादरीकरण केले जाते. तसे करणेही त्यांचा अपमानच असतो. त्या वेळी तो विशिष्ट समुदाय त्याच्या विरोधात उभा राहतो. पण संपूर्ण समाज किंवा प्रसारमाध्यमे त्यांच्या पाठीशी उभी राहिली आहेत, असे चित्र अपवादानेच पाहायला मिळते. असे विनोदही टाळले पाहिजेत.
समर्थ रामदास यांनी ‘टवाळा आवडे विनोद’ असे म्हणून ठेवले आहे. सध्या आपल्या आजूबाजूला जे काही चालले आहे ते समर्थाच्या या वचनाची आठवण करून देणारे आहे. प्रत्येकाच्या हातात आलेला स्मार्ट भ्रमणध्वनी, माहितीच्या महाजालाची क्रांती, संगणक किंवा लॅपटॉप यांचा सहज वापर, प्रसारमाध्यमांची वाढलेली संख्या, सोशल मीडियाचा भरमसाट आणि बेजबाबदार केला जाणारा वापर आणि येनकेनप्रकारेण प्रसिद्धी मिळवायचीच हा अट्टहास यातून असे किळसवाणे आणि निंदानालस्ती करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. ‘व्हॉट्स अॅप’सारख्या माध्यमामुळे अशा चित्रफिती किंवा गोष्टींचा बभ्रा व्हायलाही वेळ लागत नाही. ते वाऱ्याच्या वेगाने सगळीकडे पसरतात. खरे तर अशी चित्रफीत एखाद्या समूहावरून आली तर ती आपल्यापुरतीच मर्यादित ठेवून ती पुढे न पाठविणे किंवा ती ‘डीलीट’ करणे, त्याचा प्रसार होणार नाही याची खबरदारी आपण सुशिक्षित व सुजाण मंडळी घेऊ शकतो. ते आपल्या प्रत्येकाच्याच हातात आहे. खरे तर अशा टवाळ मंडळींना आणि त्यांनी केलेल्या असल्या उद्योगांना अनुल्लेखाने मारणेच अधिक श्रेयस्कर आहे. कारण हे सगळीकडे पसरले की त्यातून अधिक गुंतागुंत निर्माण होते, राजकीय नेते, पक्ष आणि विविध संघटना त्यात उडी घेतात आणि प्रकरणाला भलतेच वळण लागते. यातून ते करणाऱ्यांचा विशिष्ट उद्देश साध्य होतो. हे कुठेतरी थांबले पाहिजे.
एखाद्याच्या श्रद्धास्थानांची, धार्मिक प्रतीकांची किंवा वैयक्तिक स्तरावर अशा प्रकारे ‘विनोदा’च्या नावाखाली अत्यंत हीन पातळीवर जाऊन बदनामी करणे मग ती कोणीही केलेली का असेना निषेधार्हच आहे. अशा प्रकारांना पायबंद बसण्यासाठी हे प्रकार करणाऱ्यांच्या विरोधात संबंधित यंत्रणांनी तात्काळ पावले उचलणे गरजेचे आहे. या संदर्भात जे काही कायदे असतील त्या कायद्यातील कलमांचा वापर करून संबंधितांच्या विरोधात कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. तसे जर झाले तरच इतरांना जरब बसेल आणि पुन्हा असे प्रकार होणार नाहीत किंवा करणारा करण्याअगोदर किमान दहा वेळा तरी विचार करेल. कोणीही उठावे आणि विनोदाच्या नावाखाली काहीही सादर करावे इतकाही ‘विनोद’ स्वस्त नाही. मराठी साहित्य तसेच चित्रपट, दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका, नाटक या माध्यमातून याअगोदर पूर्वसुरींनी उच्च दर्जाचा, गुणवत्तापूर्ण शाब्दिक, वाचिक आणि कायिकविनोद सादर केला आहे. हिंदी साहित्यातही विनोदाची उच्च परंपरा आहे. केवळ तन्मय भट्ट, दूरचित्रवाहिन्यांवरील तथाकथित ‘कॉमेडी’ शो किंवा सोशल मीडियावरून प्रसारित होणाऱ्या असल्या चित्रफिती किंवा साहित्यामुळे विनोदाला काळिमा फासला जाऊ नये आणि त्याची आपण सर्वानीच काळजी घ्यावी, इतकीच माफक अपेक्षा. तन्मय भट्ट प्रकरणापासून तेवढा धडा प्रत्येकाने गिरविला तरी खूप झाले.
शेखर जोशी