गेल्या १२ वर्षांपासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील जेठालाल आणि तारक मेहता यांच्या मैत्रीचे उदाहरण नेहमीच दिले जाते. या शोमधून प्रेक्षकांच्या निखळ मनोरंजनासोबतच अनेकदा सामाजिक संदेश दिला जातो. या मालिकेतील प्रत्येक पात्र अनेकांच्या जिव्हाळ्याचं आहे. तर मालिकेतील गोकूळधाम सोसायटी म्हणजे चाहत्यांसाठी त्यांच दुसरं घरचं आहे.

याच मालिकेची लोकप्रियता पाहता आता ही मालिका अन्य भाषांमध्येदेखील पाहण्याची संधी प्रेक्षकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा शो आता अधिकृत युट्यूब चॅनलवर मराठीमध्ये गोकुळधामची दुनियादारी’ आणि तेलगूमध्ये ‘तारक मामा अय्यो रामा’ या नावाने उपलब्ध आहे. गुढीपाडवा आणि उगादीच्या पवित्र मुहुर्तावर याची सुरुवात झाली असून अवघ्या काही दिवसातच युट्यूब चॅनलला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान कार्यक्रमाच्या युट्युब सबस्क्रायबरची संख्या 70 लाखापेक्षा जास्त झाली आहे आणि वाढत्या प्रेक्षक संख्येमुळे चॅनेल लवकरच कार्यक्रमातील गेल्या १२ वर्षातील काही उत्तम क्षण अपलोड करण्यात येणार आहेत. तर येत्या काही दिवसांमध्ये आणखी एका प्रादेशिक भाषेत हा शो प्रेक्षकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाची ॲनिमेटेड सीरिज देखील सोनी लिव्ह वाहिनीवर सुरु करण्यात आली आहे. लहानग्यांचं मनोरंजन व्हावं या उद्देशाने ही अॅनिमेटेड सीरिज 19 तारखेपासून प्रदर्शित करण्यात आली आहे. या सीरिजमध्ये देखील गोकुळधाम मधील सर्व पात्र दाखवण्यात आली आहेत.