मराठी माणसांच्या मनावर गेली कित्येक वर्षे अधिराज्य गाजवणाऱ्या दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीने बाळासाहेब यांची भूमिका वठविली आहे. तर अमृता रावने माँसाहेब म्हणजेच मिनाताई ठाकरे यांची भूमिका साकारली आहे. गेल्या अनेक दिवसापासून या चित्रपटाची चर्चा सुरु होती. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी चित्रपटगृहाबाहेर प्रचंड गर्दी केली होती. कंगना रणावतच्या ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटासोबत प्रदर्शित झालेल्या ‘ठाकरे’ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर सरासरी कमाई केल्याचं पाहायला मिळालं.

२० कोटी रुपये खर्च करुन शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या चित्रपटाची निर्मिती केली. तर अभिजीत पानसे यांनी दिग्दर्शक पदाची धुरा सांभाळली आहे. बहुचर्चित ठरलेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी लोकप्रियता मिळविली असून बॉक्स ऑफिसवर ६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनीही ट्विट करत ही माहिती दिली.

ठाकरेची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये कमालीची होती त्यामुळे हा चित्रपट पहिल्या दिवशी २.७५ ते ३ कोटी रुपयांची कमाई करणार असा सरासरी अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र या अंदाजापेक्षाही अधिक कमाई या चित्रपटाने केली आहे. विशेष म्हणजे केवळ मौखिक प्रसिद्धीमुळेच प्रेक्षकांचा या चित्रपटाकडे येण्याचा ओघ वाढला आहे.

वाचा : Thackeray Review : पडद्यावरचा वाघ साकारण्यात नवाजुद्दीन यशस्वी

दरम्यान, ‘ठाकरे’च्या माध्यमातून बाळासाहेब यांचा जीवनप्रवास उलगडण्यात आला. विशेष म्हणजे या चित्रपटातील नवाजुद्दीनचा अभिनय पाहण्यासारखा आहे. चित्रपटातील अनेक सीनमध्ये नवाजला पाहतांना प्रत्यक्षात बाळासाहेबच समोर उभे असल्याचा भास होत होता. त्यामुळे बाळासाहेबांची भूमिका साकारण्यास नवाजला यश मिळाल्याचं दिसून येत आहे.