विकी कौशल आणि यामी गौतम स्टारर ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ हा चित्रपट मागील शुक्रवारी प्रदर्शित झाला. या सिनेमाने पहिल्या पाच दिवसांमध्येच ५० कोटींहून अधिक कमाई केली आहे. ‘ये हिंदुस्तान चुप नहीं बैठेगा, ये नया हिंदुस्तान है. ये घर मै घुसेगा भी और मारेगा भी’, असं म्हणत या चित्रपटामध्ये भारताच्या सूडाची कहाणी सांगण्यात आली आहे. एकीकडे हा सिनेमा तिकीटबारीवर दमदार कामगिरी करत असतानाच दुसरीकडे या सिनेमाच्या निर्मात्यांनी भारतीय लष्करात कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या जवानांच्या विधवांसाठी एक कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ या सिनेमाचा निर्मिती रॉनी स्क्रूवाला यांच्या आरएसव्हीपी या कंपनीने केली आहे. केदारनाथ नंतर हा या कंपनीचा सर्वात यशस्वी सिनेमा ठरला आहे. सर्वच स्तरातून सिनेमावर कौतुकाचा वर्षाव होत असताना या सिनेमाच्या संपूर्ण टीमने काल सैन्य दिनानिमित्त दिल्लीमधील एका विशेष कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. सैन्य दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या परेड तसेच इतर कार्यक्रमांना विकी कौशल, यामी गौतम आणि सिनेमाचे दिग्दर्शक आदित्य धर यांनी उपस्थिती लावली. सैन्य दिनानिमित्ताने या सिनेमाचे निर्माते असणाऱ्या आरएसव्हीपीने शहीद जवांनांच्या विधवांसाठी एक कोटींची मदत करण्याचे जाहीर केले आहे. लष्करातील जवानांच्या कार्याला सलाम करण्यासाठी ही मदत करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वीच उरीच्या टीमने भारतीय लष्करामधील काही अधिकाऱ्यांसाठी सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगचे आयोजन केले होते. लष्कराच्या आधिकाऱ्यांचे या सिनेमाबद्दलचे मत जाणून घेण्यासाठी हे स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते.

उरी आणि अनुपम खैर यांच्या ‘द अॅक्सिडेटल प्राइम मिनिस्टर’ हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले असले तरी उरी सिनेमालाच प्रेक्षकांनी झुकते माप दिल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे.