एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला असताना मोदींवरील वेब सीरिज मात्र प्रदर्शित झाली आहे. मोदींच्या बायोपिकच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. पण इरॉस नाऊ या डिजीटल प्लॅटफॉर्मवर ‘मोदी- जर्नी ऑफ अ कॉमन मॅन’ या वेब सीरिजचे पहिले पाच एपिसोड्स प्रदर्शित करण्यात आले आहेत.

ही १० भागांची मालिका नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आहे. १२व्या वर्षापासून त्यांचे तारुण्यातील आयुष्य ते भारताचे पंतप्रधान बनण्याचा त्यांचा प्रवास या सीरिजमध्ये दाखवण्यात आला आहे. या वेब सीरिजचे दिग्दर्शन उमेश शुक्ला यांनी केले आहे. तर लेखन मिहीर भुटा आणि राधिका आनंद यांचे आहे. फैजल खान, आशिष शर्मा आणि महेश ठाकूर यांनी मोदींच्या आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यावरील भूमिका साकारल्या आहेत. या सीरिजमधील प्रत्येक एपिसोड ३५ ते ४० मिनिटांचा आहे. इरॉस नाऊच्या या ओरिजनल सीरिजची निर्मिती उमेश शुक्ला आणि आशिष वाघ यांच्या बेंचमार्क पिक्चर्सतर्फे करण्यात आली आहे.

या सीरिजच्या प्रदर्शनाबाबत इरॉस ग्रुपच्या मुख्य कंटेंट ऑफीसर रिधिमा लुल्ला म्हणाल्या, ‘ ‘मोदी: जर्नी ऑफ अ कॉमन मॅन’ची कथा महत्त्वपूर्ण आहेच, शिवाय मनोरंजकही आहे. जनसामान्यांपर्यंत पोहोचून त्यांच्याशी संबंधित कथा दाखवण्यावर इरॉसने नेहमीच विश्वास ठेवला आहे. या बायोपिकमधून त्यांचा संघर्ष, उद्दिष्टे, तीव्रता आणि यश याची कथा दाखवण्यात आली आहे.’

दुसरीकडे लोकसभा निवडणूक तोंडावर असताना मोदींचा बायोपिक प्रदर्शित करणे म्हणजे आचारसंहितेचा भंग आहे असा आरोप विरोधकांनी केला आहे. मोदींच्या बायोपिकला तीव्र विरोध होत असतानाच हा चित्रपट येत्या ११ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.