स्वाती वेमूल

काश्मिरी पंडितांच्या बाजूने कोणीच उभं राहिलं नाही, आजवर कोणत्याच सरकारने त्यांना मदत केली नाही.फक्त एकच माणूस त्यांच्या पाठीशी उभा राहिला. ते म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, असं प्रसिद्ध चित्रपट निर्माते विधू विनोद चोप्रा यांनी सांगितलं आहे. लोकसत्ता ऑनलाइनला दिलेल्या मुलाखतीवेळी ते बोलत होते.

काश्मिरी पंडितांच्या परिस्थितीत ३० वर्षानंतर काही बदल झाला आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, “मागील ३० वर्षांमध्ये कोणत्याच सरकारने काश्मिरी पंडितासाठी काहीच केलं नाही. केवळ एकच व्यक्ती त्यांच्या पाठीसी उभी होती, ती म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. त्यांनी काश्मिरी पंडितांच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना रोजगारासाठी मदत केली. सर्व काश्मिरी पंडितांच्यावतीने मी त्यांचा आभारी आहे.

यावेळी चोप्रा यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याबद्दलही वक्तव्य केलं. ते म्हणाले आदित्य हे माझे चांगले मित्र आहेत. आम्ही आदित्य ठाकरेंना सांगू इच्छितो की, त्यांच्या आजोबांनी आमच्यासाठी जे केलं कोणत्याच सरकारने किंवा नेत्यांनी केलेलं नाही.

काश्मिरी पंडितांची व्यथा ‘शिकारा’ या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर मांडणारे प्रसिद्ध चित्रपट निर्माते विधू विनोद चोप्रा हे या चित्रपटाला विरोध करणाऱ्यांवर चांगलेच भडकले आहेत. “शिकाराला विरोध करणारे माकड आहेत अशा शब्दांत त्यांनी आपला राग व्यक्त केला आहे. यासंदर्भात त्यांनी एका फेसबुक पोस्टद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.”

चोप्रा म्हणतात, “शिकारा चित्रपटाबाबत आलेल्या काही प्रतिक्रियांमुळे मी व्यथित झालो आहे. माझ्या ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ३३ कोटी रुपये कमावले होते. तर माझ्या आईच्या स्मरणार्थ मी बनवलेल्या ‘शिकारा’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ३३ लाख रुपये कमावले. यावरुन लोकांनी मला ट्रोल केलं. मी काश्मिरी लोकांच्या दुःखाच भांडवल केल्याचा आरोप लोकांनी माझ्यावर केला. त्यामुळं माझं अशा लोकांना एवढंच सांगणं आहे की, त्यांनी माकड होऊ नये. प्रत्यक्ष चित्रपट पहावा त्यानंतर त्यावर भाष्य करावं.” मुंबईत के. सी. कॉलेजमध्ये या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान ते बोलत होते. यानंतर चोप्रा यांनी फेसबुक पोस्टवरुनही सविस्तरपणे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.