बॉलिवूडचे दोन दिग्गज म्हणजेच आमिर खान आणि अमिताभ बच्चन आगामी ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या बिग बजेट चित्रपटात एकत्र काम करत आहेत. सोमवारी या चित्रपटाचा लोगो आणि मंगळवारी मोशन पोस्टर प्रदर्शित झाला. या मोशन पोस्टरमधून बिग बींचा चित्रपटातील लूक सर्वांसमोर आला. त्यासोबतच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली. दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजेच ८ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सुरुवातीला प्रदर्शनाची तारीख ७ नोव्हेंबर रोजी ठरवण्यात आली होती. पण आमिरने ती एक दिवस पुढे ढकलली. अर्थात ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिरचा यामागे नक्कीच काहीतरी विचार असणार.

चित्रपट कोणत्या तारखेला प्रदर्शित केल्यास प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळेल आणि कोणत्या नाही याची आमिरला व्यवस्थित जाण आहे. त्यातच ७ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन असल्याने संध्याकाळच्या वेळेस फारसे प्रेक्षक चित्रपटगृहांकडे वळणार नाहीत आणि म्हणूनच आमिरने प्रदर्शनाची तारीख एक दिवस पुढे ढकलली, असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषकांनी वर्तवला आहे.

‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ हा चित्रपट फिलिप मेडोस टेलर यांच्या ‘कन्फेशन्स ऑफ अ ठग अँड द कल्ट ऑफ द ठगी’ या कादंबरीवर आधारित आहे. यामध्ये आमिर आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबतच फातिमा सना शेख आणि कतरिना कैफ यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन विजय कृष्ण आचार्य यांनी केले आहे.