अभिनेता शाहरुख खानच्या आगामी चित्रपटाचीच सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. कलाकारांसाठी या चित्रपटाची स्पेशल स्क्रिनिंग पार पडली असून सध्या अनेक कलाकार या चित्रपटाचे कौतुक करत आहेत. या चित्रपटामध्ये अभिनेता शाहरुख खान ‘जहांगीर खान’ नावाचे एक पात्र साकारत आहे. ज्यामध्ये तो एका मानसोपचारतज्ज्ञाच्या भूमिकेत दिसेल. अभिनेत्री आलिया भट्ट आणि किंग खान या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच स्क्रिन शेअर करत आहेत. त्यामुळे आलियाने साकारलेली ‘कायरा’ आणि शाहरुखने साकारलेल्या ‘जहांगीर’ या पात्रांची भेट घेण्यासाठी आणि ‘डिअर जिंदगी’ हा चित्रपट का पाहाल हे सांगणारी ही आहेत पाच महत्त्वाची कारणे..

महिलाप्रधान कथानक- ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ असो ‘प्यार का पंचनामा’ किंवा अगदी ‘देव डी’सारखे चित्रपट असो. मुलांचे ब्रेकअप्स, त्यांची मनस्थिती आणि त्यानंतर त्यांच्या जीवनात येणारी वळणं याबाबत चित्रपटांमध्ये नेहमीच भाष्य केले गेले आहे. पण हीच परिस्थिती जेव्हा एका मुलीसमोर उद्भवते त्यावेळी तिची नेमकी काय अवस्था असते यावर हा चित्रपट भाष्य करत आहे. त्यामुळे महिलाप्रधान कथानक हा या चित्रपटाचा कणा आहे.

शाहरुखची वेगळी भूमिका- रोमॅण्टिक आणि एकाच नजरेने चाहत्यांना घायाळ करणारा अभिनेता शाहरुख खान या चित्रपटामध्ये त्याच्या चौकटीपलीकडील भूमिका साकारत आहे. या चित्रपटामध्ये शाहरुखने साकारलेली भूमिका पाहता ती त्याच्या ‘चकदे इंडिया’ या चित्रपटातील ‘कोच कबीर’च्या भूमिकेच्या जवळ जाणारी वाटत आहे. त्यामुळे शाहरुखच्या अभिनयाची आणखीन एक बाजू पाहण्यासाठी ‘डिअर जिंदगी’ पाहाच.

किंग खान आणि आलियाचे चित्रपटातील नाते आहे तरी काय?- ‘डिअर जिंदगी’ या चित्रपटाचा ट्रेलर आणि टिझर प्रेक्षकांची दाद मिळवत आहेत. असे असतानाच अभिनेत्री आलिया भट्ट आणि शाहरुख खान यांच्या भूमिकांविषयीसुद्धा बॉलिवूड वर्तुळामध्ये चर्चा होत आहेत. शाहरुख आणि आलियाने साकारलेली पात्र पाहता ‘कायरा’च्या मनात ‘जहांगीर’विषयी एक वेगळीच (प्रेमाची) भावना असल्याचे जाणवते. या चित्रपटाच्या ‘ऐ जिंदगी गले लगा ले’ या गाण्यातून तरी निदान तसेच दिसत आहे. त्यामुळे शाहरुख आणि अलियाची ऑनस्क्रिन केमिस्ट्री पाहण्यासाठी, त्यांचे या चित्रपटातील नाते जाणून घेण्यासाठी अनेकांचे पाय चित्रपटगृहांकडे वळतील.

नवे कथानक- गौरी शिंदे दिग्दर्शित या चित्रपटाचे कथानकही एका वेगळ्याच विषयावर भाष्य करत आहे. गौरीने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करतानाही ‘इंग्लिश विंग्लिश’ या चित्रपटातून नवे कथानक मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता. त्या चित्रपटाला मिळालेले यश पाहता गौरीकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. त्याच अपेक्षा पूर्ण करण्यासाठी गौरी शिंदे ‘डिअर जिंदगी’ या चित्रपटाद्वारे सज्ज झाली आहे. त्यामुळे कायरा, जहांगीर, कायराचे ब्रेकअप आणि त्यातून सावरण्यासाठी तिची सुरु असणारी धडपड या चित्रपटातून पाहता येणार आहे.

जीवनातल्या लहान गोष्टींचाही आनंद घ्यायला शिकवणारा चित्रपट- हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात सर्वच जण काही ना काही करण्यात व्यग्र आहेत. करिअर, काम, कुटुंब, पैसा या सर्वामध्या सगळजण गुंतले आहेत. त्यामुळे आयुष्यामध्ये लहानसहान गोष्टींमधला आनंद शोधत असाल तर त्यासाठी ‘कायरा’ तुम्हाला मदत करु शकते.

वाचा:सेलिब्रिटींनाही पडली ‘डिअर जिंदगी’ची भुरळ