छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ठरलेल्या ‘प्रतिज्ञा’ मालिकेतून घराघरात पोहोचलेले अभिनेता अनुपम श्याम सध्या किडनीच्या समस्येने त्रस्त आहेत. मुंबईतील लाइफलाइन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या काळात त्यांची मदत करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुढे सरसावले आहेत. त्यांनी अधिकाऱ्यांना अनुपम यांची मदत करण्याचे आदेश दिले आहेत.

गेल्या सहा महिन्यांपासून अनुपम आजारी असून त्यांच्यावर गोरेगावमधील लाइफलाइन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या काळा आर्थिक समस्या भेडसावत असल्यामुळे त्यांच्या भावाने अनुराग श्याम यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आर्थिक मदत मागितली होती. त्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना अनुपम यांची मदत करण्याचे आदेश दिले आहेत. तसंच योगी आदित्यनाथ यांच्यापूर्वी अभिनेता सोनू सूद आणि मनोज बाजपेयी यांनीदेखील अनुपम यांनी मदत केली आहे.

दरम्यान, ‘गेल्या सहा महिन्यांपासून अनुपम हे आजारी आहेत. त्यांच्या मूत्रपिंडाला संसर्ग झाल्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून ते हिंदूजा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. त्यावेळी त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली होती. पण त्यांना डॉक्टरांनी वेळच्या वेळी डायलिसिस करण्यास सांगितले होते. डायलिसिसचा खर्च खूप असल्यामुळे त्यांनी आयुर्वेदिक उपचार घेण्याचे ठरवले. पण त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली नाही’, असं अनुराग यांनी एका मुलाखतीत सांगितलं.