करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे संपूर्ण जग सध्या त्रस्त आहे. परंतु या प्राणघातक विषाणूला रोखण्यासाठी आशेचा एक किरण आता दिसू लागला. करोना व्हायरसविरोधात लस निर्मितीमध्ये इस्रायल महत्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. इस्रायल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल रिसर्चने करोना व्हायरस अ‍ॅंटीबॉडी किंवा पॅसिव्ह लस विकसित करण्याचा टप्पा पूर्ण केला आहे. परंतु या दरम्यान देशवासीयांना प्रेरणा देण्यासाठी चक्क वरुण धवनच्या चित्रपटातील डायलॉग इस्रायलने ट्विट केला आहे.

एबीसीडी २ या चित्रपटातील “सही दिशा में उठा हर कदम … अपने आप में एक मंज़िल है… आखिर ज़िन्दगी का मतलब ही अपना अगला कदम चुनना है।” हा डायलॉग इस्रायलच्या अधिकृत अकाउंटवरुन ट्विट करण्यात आला. या ट्विटसाठी अभिनेता वरुणने इस्रायलचे आभार मानले आहे. “माझा डायलॉग थेट इस्रायला पोहोचला हे ऐकून खूपच आनंद झाला. माझ्या प्रार्थना तुमच्यासोबत आहेत.” अशा आशयाचे ट्विट त्याने केले आहे.

तयार केलेले अँटीबॉडी विषाणूवर हल्ला करुन त्याला शरीरामध्येच संपवून टाकतात अशी माहिती संशोधकांच्या टीमने इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांना दिली. इन्स्टिट्यूट आता या अँटीबॉडीसाठी पेटंट मिळवण्याबरोबरच व्यावसायिक निर्मितीसाठी काँन्ट्रॅक्ट करण्याच्या प्रयत्नात आहे. बिझनेस स्टॅंडर्डने हे वृत्त दिले आहे.

‘बायोलॉजिकल इन्स्टिट्यूट स्टाफने महत्वपूर्ण यश मिळवले असून त्यांचा आम्हाला अभिमान आहे’ असे संरक्षण मंत्री नाफताली बेन्नेट म्हणाले. ‘ज्युंची कल्पकता आणि हुशारीमुळे हे साध्य झाले’ असे बेन्नेट म्हणाले.