भारताचे आठवे लष्करप्रमुख सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित ‘सॅम’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा मागील काही महिन्यांपासून सुरु आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे असं समजतंय ते विकी कौशलच्या फोटोवरून. माणेकशॉ यांच्या प्रसिद्ध फोटोप्रमाणेच पोज आणि पोषाख परिधान करुन असलेला विकीचा माणेकशॉ यांच्या भूमिकेतील फोटो मध्यंतरी व्हायरल झाला होता. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये माणेकशॉ यांच्या प्रसिद्ध फोटोप्रमाणे विकी या फोटोमध्ये टेबलसमोर बसलेला दिसतोय. भारतीय लष्कराचा पोषाख, तोंडावरील स्मितहास्य, मिशा असा विकीचा हा लूक सध्या चर्चेचा विषय ठरला होता.

या लूकची प्रशंसा झाली असली तरीसुद्धा या लूकमध्ये काही चूका आहेत. त्यांची काळजी घेतली पाहिजे असे म्हटले जात आहे. लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सय्यद अता हसनैन यांनी ट्विटरच्या माध्यमातून विकीच्या पोषाखातील चुका सांगितल्या आहेत. त्यांनी केलेल्या ट्विटनुसार विकीने चुकीच्या रंगाचे बॅचेस परिधान केले आहेत. ‘सॅम यांनी कायमच फक्त काळे बॅचेस परिधान केले’ असे त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

‘राजी’ फेम दिग्दर्शिका मेघना गुलजार माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. रॉनी स्क्रूवाला या चित्रपटाचे निर्माती करणार आहे. २०२१ मध्ये या सिनेमाच्या चित्रिकरणाला सुरुवात होणार असून सध्या सिनेमाच्या पटकथेवर काम सुरु आहे. चित्रपटातील काही भागामध्ये १९७१ सालच्या युद्धाचा काळ दर्शविला जाणार आहे. माणेकशॉ यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांचीही भेट घेण्याचा मेघना गुलजार यांचा विचार असल्याचे त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते.