संपूर्ण देशात सध्या ‘नागरिकत्व दुरुस्ती विधेयका’वर जोरदार चर्चा सुरु आहे. नुकतेच राज्यसभेत ११७ विरुद्ध ९२च्या फरकाने हे विधेयक मंजूर झाले. देशातील काही मंडळींनी याला जोरदार विरोध केला तर काहींनी त्याला पाठिंबादेखील दिला. दरम्यान ‘जामिया मिलिया इस्लामिया’ विद्यापीठातील काही विद्यार्थांनी ‘नागरिकत्व दुरुस्ती विधेयक’ मुस्लिम विरोधी आहे, असे म्हणत आंदोलन केले होते.

आंदोलन करणाऱ्या या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या प्रकारावर बॉलिवूड अभिनेता विकी कौशल याने संताप व्यक्त करत ट्विट केले आहे. त्याने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थांचे समर्थन केले आहे.

काय म्हणाला विकी कौशल?

“सध्या देशात जे घडत आहे ते योग्य नाही. देशातील प्रत्येक नागरिकाला स्वत:चे विचार शांततामय मार्गाने मांडण्याचा अधिकार आहे.” अशा आशयाचे ट्विट करुन ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ फेम विकी कौशलने आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्याचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांपूर्वी शेअर केलेल्या या पोस्टवर आतापर्यंत हजारो नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यापूर्वी पूजा भट्ट, परिणीती चोप्रा, रेणूका शहाणे, जावेद जाफरी, हूमा खुरेशी, स्वरा भास्कर या बॉलिवूड कलाकारांनी ट्विट केले होते.