मनोरंजन क्षेत्रातील सायली ड्रीम व्हेंचर्स आणि ड्रीम शॉप एन्टरटेन्मेंट यांच्या संयुक्त विद्यमाने कलाकारांच्या कलाजीवनाचा वेध घेणाऱ्या ‘नॉट आऊट’ या कार्यक्रम मालिकेचे आयोजन केले जाणार आहे. या अंतर्गत पहिला कार्यक्रम ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांच्या कलाजीवनावर आधारित आहे. हा कार्यक्रम ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता माटुंगा येथील यशवंत नाटय़मंदिर येथे होणार आहे.
एखादा कलाकार वृद्ध झाल्यानंतर त्याला त्याच्या आयुष्याच्या संध्याकाळी जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येते. त्या वयात कलाकाराची उमेद, उत्साह मावळलेला असतो. त्याऐवजी वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरतो काम करत असतानाच त्याचा गौरव केला, त्या कलाकाराच्या कला कारकिर्दीचा आढावा घेणारा कार्यक्रम सादर केला गेला, तर त्या कलावंतासाठीही तो आनंदाचा क्षण असेल आणि उर्वरित आयुष्य जगण्यासाठीही तो त्याला प्रेरणादायी ठरेल. याच उद्देशाने ‘नॉट आऊट’या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.
‘विजूमामा नॉट आऊट’ या कार्यक्रमात विजय चव्हाण यांनी आजवर केलेल्या विविध भूमिका, त्यांच्यावरील गाणी, त्यांच्याविषयीचे किस्से, त्यांच्यासमवेत काम केलेल्या कलाकारांबरोबर गप्पा असे या कार्यक्रमाचे स्वरूप असणार आहे. या कार्यक्रमाचे निवेदन भूषण कडू व पुष्कर श्रोत्री करणार असून या वेळी सादर होणाऱ्या ‘मामाच्या गावाला जाऊ या’ कार्यक्रमात भरत जाधव, केदार शिंदे, विजय केंकरे, अलका कुबल, किशोरी अंबिये हे विजय चव्हाण यांच्याशी गप्पा मारणार आहेत. प्रदीप पटवर्धन ‘मोरुची मावशी’ नाटकातील काही प्रवेश सादर करणार आहेत. कमलाकर सातपुते, अभिजीत चव्हाण, संतोष पवार, वरद चव्हाण, अतुल तोडणकर, अभिजीत केळकर, दीपाली सय्यद, सुनील पाल आदी कलाकारही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. याचे दिग्दर्शन ज्ञानेश भालेकर यांचे आहे.